Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं मिशन विदर्भ महाविकास आघाडीची (Mahavikas aghadi)खासकरून काँग्रेसची (Congress) डोकेदुखी वाढवणार आहे का? असा प्रश्न आता राजकीय वर्तुळातून उपस्थित केला जात आहे. यामागील कारण म्हणजे उद्धव ठाकरे  (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेने मिशन विदर्भाच्या नावाखाली विदर्भात आपल्या शक्तीची चाचपणीच सुरू केली आहे. इतकंच नव्हे तर जास्तीत जास्त मतदारसंघांवर दावा करण्याची रणनीती ही आखली आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा क्षेत्रांपैकी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने पूर्व नागपूर, मध्य नागपूर आणि दक्षिण नागपूर अशा तीन मतदारसंघांवर दावा केलाय. तर रामटेक लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा क्षेत्रांपैकी कामठी, हिंगणा, रामटेक, आणि उमरेड तब्बल चार विधानसभा क्षेत्रांमध्ये आमचे उमेदवार राहतील, असा दावा उद्धवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी केलाय. त्यामुळे उद्धव ठाकरेंचा मिशन विदर्भ काँग्रेसची डोकेदुखी वाढवणार, अशीच सध्याचे चिन्ह दिसत आहेत.


उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं मिशन मॅक्झिमम विदर्भ?


शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव सध्या नागपूर आणि विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान ते पूर्व विदर्भातील तीस विधानसभा मतदारसंघातील परिस्थितीचा आढावा घेत आहेत. या आढावा बैठकीत जिल्हा प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, विधानसभा संघटक यासह विधानसभा निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांना बोलवण्यात आले आहे. त्यामुळे, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारामधून शेकडो इच्छुक नागपुरात दाखल झाले आहे. ही स्वबळाची तयारी नसून पक्षाच्या क्षमता आणि शक्तीची चाचपणी असल्याचे मत भास्कर जाधव यांनी बोलताना व्यक्त केले आहे.


दरम्यान, आता  शिवसेनेचा डोळा फक्त नागपूर मधील काही जागांवरच नाही आहे, तर पूर्व विदर्भातील पाच लोकसभा मतदारसंघातील 30 विधानसभा क्षेत्रांपैकी किमान 14 जागांवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा डोळा आहे. ज्या 14 जागांवर सध्या भाजपचे आमदार आहे किंवा शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार आहेत. त्या जागांवर आमचा नैसर्गिक दावा असल्याचे मतही भास्कर जाधव यांनी व्यक्त केल्याने विदर्भात महाविकास आघाडीच्या जागा वाटपात स्वतःला मोठा भाऊ समजणाऱ्या काँग्रेस वर दबाव वाढला आहे. 


पूर्व विदर्भात पाच मतदारसंघातील 30 पैकी 14 विधानसभा क्षेत्रांवर दावा 


देशातील सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या निकालांनी देश आणि राज्य पातळीवर भाजपला चांगलाच धक्का दिला आहे. विदर्भातील भाजपची बऱ्यापैकी पकड असलेल्या मतदारसंघातही महायुतीचा दारुण पराभव झाला आहे. विशेष म्हणजे, विदर्भात  काँग्रेसने  (Congress)  घरवापसी करत दहा पैकी 7 मतदारसंघात महाविकास आघाडीला यश मिळवून दिले आहे. तर भाजप 2 आणि शिंदेच्या शिवसेनेला अवघ्या 1 ठिकाणी असे महायुतीला यश आले आहे. त्यामुळे विदर्भात महाविकास आघाडीने (Mahavikas aghadi) चांगलीच मुसंडी मारली असून काँग्रेस विदर्भातही सर्वत मोठा पक्ष ठरला आहे. अशातच आता आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने मविआ, महायुतीसह इतर पक्षही जोमाने तयारीला लागले आहे.


तर दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने विदर्भात पक्ष किती विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढू शकतो, किंवा किती जागा जिंकू शकतो, याचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, पूर्व विदर्भात पाच लोकसभा मतदारसंघातील 30 पैकी 14 विधानसभा क्षेत्रांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने दावा केल्याने उद्धव ठाकरे यांचा मिशन विदर्भ काँग्रेसची डोकेदुखी वाढवणार का, की उद्धव ठाकरे यांना यात यश येतं, हे पाहणं आता महत्वाचे ठरणार आहे.


इतर महत्वाच्या बातम्या