नांदेड जिल्ह्यातील नायगाव विधानसभा मतदारसंघात 2009 ला राष्ट्रवादी कॉंग्रेस विरोधात अपक्ष अशी लढत झाली होती. या लढतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बंडखोर असलेले आणी अपक्ष म्हणून उभे राहीलेले वसंत चव्हाण विजयी झाले होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बापुसाहेब गोरठेकर यांचा अकरा हजार मतांनी पराभव करत चव्हाण विजयी झाले. जवळपास तितक्याच फरकाने 2014 साली झालेल्या निवडणूकीत वसंतराव यांनी भाजपच्या राजेश पवार यांचा पराभव केला आणी दुसऱ्यांदा ते विजयी झाले. मात्र आता या मतदारसंघातील चित्र बदललं आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बापुसाहेब गोरठेकर यांनी नुकताच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्याचा फायदा नायगाव विधानसभेच्या निवडणूकीत भाजपाला होऊ शकतो. त्यामुळे आता इथुन भाजपच्या इच्छुकांची संख्या वाढली आहे.


आमदार म्हणून वसंतराव चव्हाण यांनी दहा वर्षाच्या काळात खूप  काम केलं आहे. मतदारसंघासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात निधी खेचुन आणला. जनसेवेसाठी सगळं चव्हाण कुटुंब कायम तत्पर असतं. म्हणूनच जिल्ह्यात त्यांची लोकप्रियता चांगलीच आहे. नायगाव गावामधल्या ग्रामपंचायंतीच्या जागेच्या विक्रीचा वाद सोडला तर चव्हाण यांच्यावर गेल्या दहा वर्षात भ्रष्टाचाराचे कोणतेही गंभीर आरोप झाले नाहीत. त्यामुळे वसंतराव पुन्हा एकदा कामाला लागले आहेत. मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत या मतदारसंघातुन भाजपला 20 हजार पेक्षा जास्त मताधिक्य आहे. त्यामुळे भाजपच्या गोटात नवचैतन्य पसरलेलं आहे. इथुन भाजपकडुन बालाजी बच्चेवार, श्रावण भिलवंडे, मिनल खतगावकर, माणिक लोहगावे यांच्यासह पुन्हा एकदा राजेश पवार उत्सुक आहेत. स्थानीक उमेदवार द्यावा असा इथल्या जुन्या कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. भाजप नेते भास्करराव पाटील खतगावकर आपल्या सुनबाईच्या उमेदवारीसाठी आग्रही आहेत. मात्र इथ खतगावकर की राजेश पवार याबाबत अंतीम क्षणी निर्णय अपेक्षीत आहे.

नायगाव विधानसभा मतदारसंघ हा उमरी, धर्माबाद आणि नायगाव अशा तीन तालुक्यात विखुरलेला आहे. मराठा, मातंग, लिंगायत आणि धनगर समाजाची मतं इथं निर्णायक संख्येने आहेत. त्यामुळे कॉंग्रेस आणि भाजपच्या मत विभाजनात वंचित आघाडीला फायदा होऊ शकतो. अशी शक्यता गृहीत धरुन वंचित आघाडीकडुन इथं उत्तम गवाले, आनंद रोहरे, भास्कर भिलवंडे, शिवाजी कागदे यांनी उमेदवारी मागीतली आहे.

शिवसेनेकडुन गंगाधर बडूरे, रवींद्र भिलवंडे आणि माधव कल्याण हे निवडणुक मैदानात उतरण्यास तयार आहेत. त्यातच बापुसाहेब गोरठेकर यांनी पक्ष सोडल्यामूळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मारोती कवळे हे आता एकटे पडले आहेत. मात्र कवळे यांना उमरी, धर्माबाद भागात चांगला जनाधार आहे. त्यामुळे कवळे देखील वंचीत आघाडीकडुन निवडणूक मैदानात उतरण्यास सज्ज झाले आहेत. कवळे जर मैदानात उतरले तर भाजप आणि कॉंग्रेसची डोकेदुखी वाढणार आहे. बापुसाहेब गोरठेकर यांच्या भाजप प्रवेशामुळे मतदारसंघात आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचं अस्तित्व राहीलेलं नाही. या स्थितीत वसंतराव चव्हाण तिसऱ्यांदा निवडूण येतात का ते पाहण रंजक ठरणार आहे.

नायगाव मतदारसंघातील समस्या 

गोदावरी नदी वाहणाऱ्या या मतदारसंघात गेल्या पाच-सात वर्षात रेती माफियांनी थैमान घातलं आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासुन नदी काठच्या गावांच्या रस्त्यांची अक्षरक्ष: चाळणी झाली आहे. रेती माफियांना मिळणाऱ्या राजकीय पाठबळामूळे हा मतदारसंघ म्हणजे रेती माफियांचा अड्डा बनला आहे. रेतीच्या अजस्त्र वाहनांमुळे अनेक गावांना जाणारे रस्ते जिवघेणे बनले आहेत. तर काही गावांना जायला साधे रस्तेही उपलब्ध नाहीत.

या मतदारसंघात सिंचनाच्या सोयी गेल्या पंधरा वर्षात फारशा वाढल्याच नाहीत. पण गोदावरी नदीकाठावर या मतदारसंघात शेती मोठ्या प्रमाणात सिंचनाखाली आहे आणी त्याउलट इतरत्र कायम दुष्काळसदृश्य परीस्थिती आहे. मतदारसंघातील कृष्णुर इथे नावालाच पंचतारांकित औद्योगीक वसाहत आहे. पण या वसाहतीत फारसे उद्योग अद्याप आलेच नाहीत. त्यामुळे इतक्या वर्षानंतरही या तालुक्याची बेरोजगारीची समस्या कायमच आहे. या मतदारसंघातील अनेक बेकार पोटाची खळगी भरण्यासाठी वर्षानूवर्ष हैद्राबादला जात असतात. मात्र इथल्या राज्यकर्त्यांनी बेकारीच्या समस्येकडे कधीही लक्ष दिल नाही. या स्थितीत आता विधानसभा निवडणूका येऊ घातल्या आहेत. त्यामुळे इथले मतदार कुणाला कौल देतील त्याकडे सर्वांच लक्ष लागलेल आहे.