मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षाला लागलेली गळती कमी झालेली नाही. दोन मेगाभरती नंतर भाजपची तिसरी मेगाभरती आज (11 सप्टेंबर) पार पडणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला रामराम ठोकलेले अनेक दिग्गज नेते आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहे.


भाजपची तिसरी मेगाभरती आज दुपारी 3 वाजता मुंबईच्या गरवारे क्लब येथे होणार आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे नवी मुंबईतील बडे नेते, माजी मंत्री गणेश नाईक, मुंबईतील काँग्रेस नेते, माजी मंत्री कृपाशंकर सिंह यांच्यासह इंदापूरचे काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील, साताऱ्याचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष आणि पृथ्वीराज चव्हाण यांचे निकटवर्तीय आनंदराव पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडणार आहे. मेगाभरतीशिवाय विरोधी पक्षातील अनेक भाजप-शिवसेनेत येण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे निवडणुकीसाठी नवीन उमेदवार शोधणे काँग्रेस-राष्ट्रवादीसमोर मोठं आव्हान असणार आहे.

दुसरी मेगाभरती

काही दिवसांपूर्वीच केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे दिग्गज नेते पद्मसिंह पाटील यांचे पुत्र आमदार राणा जगजितसिंह यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे माजी खासदार धनंजय महाडिक आणि काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला आहे.



पहिली मेगाभरती

भाजपच्या मेगाभरतीच्या पहिल्या टप्प्यात राष्ट्रवादीचे दिग्गज नेते मधुकरराव पिचड, त्यांचे पुत्र विद्यमान आमदार वैभव पिचड, आमदार शिवेंद्रराजे भोसले, संदीप नाईक, चित्रा वाघ, काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता.


संबंधित बातम्या