इंदापूर : काँग्रेसचे नेते, माजी संसदीय कामकाज मंत्री हर्षवर्धन पाटील उद्या भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यांचा भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरल्या नंतर इंदापूर शहरात हर्षवर्धन पाटलांच्या भाजप प्रवेशाचे फलक झळकले आहेत. कार्यकर्त्यांकडून बॅनर लावून भाजप प्रवेशासाठी हर्षवर्धन पाटील यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत.


हर्षवर्धन पाटील यांनी 3 सप्टेंबरला इंदापूर येथे कार्यकर्त्यांचा मेळावा घेत काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. उद्या दुपारी मुंबईच्या गरवारे क्लब येथे होणाऱ्या भाजपच्या मेगा भरतीत हर्षवर्धन पाटील कमळ हाती घेणार हाती घेणार असल्याची चर्चा आहे. त्या पार्श्वभीमीवर इंदापूर मधून त्यांचे कार्यकर्ते आपला पाठींबा दर्शवत आहेत. उद्या दुपारी हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये प्रवेश करण्याची चर्चा असल्याने आतापासूनच इंदापूर शहरात त्यांच्या कार्यकर्त्यांकडून भाजप प्रवेशाबद्दल स्वागताचे फलक लावण्यात येत आहेत. या फलकावर भाजपच्या बड्या नेत्यांसोबत हर्षवर्धन पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे फोटो झळकलेले दिसत आहेत. हर्षवर्धन पाटील यांचे हजारो कार्यकर्ते उद्या मुंबईत दाखल होणार आहेत.

उद्या बुधवारी भाजपाची तिसरी मेगाभरती मुंबईच्या गरवारे क्लब येथे दुपारी 3 वाजता होणार आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे नवी मुंबईतील बडे नेते, माजी मंत्री गणेश नाईक, मुंबईतील काँग्रेस नेते, माजी मंत्री कृपाशंकर सिंह यांच्यासह इंदापूरचे काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील, साताऱ्याचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष आणि पृथ्वीराज चव्हाण यांचे निकटवर्तीय आनंदराव पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडणार आहे. मेगाभरतीशिवाय विरोधी पक्षातील अनेक भाजप-शिवसेनेत येण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे निवडणुकीसाठी नवीन उमेदवार शोधणे काँग्रेस-राष्ट्रवादीसमोर मोठं आव्हान असणार आहे.

हर्षवर्धन पाटील यांच्याबाबत अजूनही आशावादी : पृथ्वीराज चव्हाण