Success story : अलिकडच्या काळात शेतीमध्ये (Agriculture) उत्पन्न वाढीसाठी रासायनिक खंताचा वापर मोठ्या  प्रमाणात होत चालला आहे. परिणामी जमिनीचा पोत बिघडत चालला आहे. रासायनिक खत टाळून अलिकडच्या काळात काही शेतकरी सेंद्रिय शेतीची (Organic farming) कास धरत वेगवेगळे प्रयोग करुन लाखोंचं उत्पन्न घेत आहेत. असाच एक प्रयोग वाशिमच्या एका शेतकऱ्याने केला आहे. राधेश्याम मंत्री (Radheshyam Mantri) असं या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांनी आपल्या शेतात तीन एकर क्षेत्रावर  लायलपुरी जातीच्या खरबुजाची (Kharbuj) लागवड केली आहे. 82 दिवसाच्या खरबूज पिकाने मंत्री यांना लखपती केलं आहे.


खरबुजाची स्थानिक बाजारात विकी न करता काश्मीरला पाठवण्याचा निर्णय 


वाशिमच्या राधेश्याम मंत्री यांची तामसी शिवारात शेतजमीन आहे. मंत्री गेल्या अनेक वर्षापासून शेतीत विविध प्रयोग करतात. मात्र, पारंपारिक पिकामध्ये उत्पन्न मिळत नसल्याने मंत्री यांनी आपल्या दोन एकर शेतात अॅप्पल बोर पिकाची लागवड केली. मात्र बोरांना अवधी लागणार असल्याने त्यामध्ये त्यांनी अंतरपीक म्हणून खरिपाचे सोयाबीन पीक केले. त्यानंतर त्यातच खरबूज पिकाचा प्रयोग केला. हा खरबूज लागवडीचा प्रयोग त्यांनी यशस्वी करुन दाखवला आहे. मंत्री यांच्या शेतातील 82 व्या दिवशी खरबूज तोड सुरु झाली. मात्र, मंत्री यांनी हे खरबूज स्थानिक बाजारात न विकता व्यापाऱ्याच्या मदतीने थेट जम्मू काश्मीरला पाठवण्याचा निर्णय घेतला. ज्यातून त्यांना थेट शेतातून 17 रुपये प्रतिकिलो एवढा दर  जागेवरच मिळत आहे.




मंत्री यांनी स्थानिक बाजारात विक्री केली असती तर केवळ दहा ते बारा रुपये दर मिळाला असता. मात्र, आपल्या पिकाची विक्री इतर राज्यातील व्यापारी खरेदी करु शकतात याचा अचूक अंदाज घेत त्यांनी कश्मीर  निवडले आणि याचा फायदाही मिळाला. 


सहा ते साडेसहा लाखांचे उत्पन्न मिळणार 


मंत्री यांच्या शेतातून पहिल्या तोडणीत साधारण 20 टनांचे खरबूज निघाले आहे. तर आणखी 17 ते 18 टन उत्पादन पुन्हा मिळणार आहे. ज्यातून त्यांना सहा ते साडेसहा लाखांचे उत्पन्न होणार आहे. 50 हजारांचा खर्च वजा जाता मंत्री यांना एकरी दोन लाखांचा निव्वळ नफा मिळणार आहे. वाशिमचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांच्या हस्ते हिरवी झेंडा दाखवून ट्रक जम्मू काश्मीरला रवाना करण्यात आला आहे.



अनेक वर्षांपासून मंत्री करत आहेत संपूर्ण सेंद्रिय शेती


राधेश्याम मंत्री हे गेल्या अनेक वर्षांपासून संपूर्ण सेंद्रिय शेती करत आहेत. त्यासाठी त्यांना 2018 साली महाराष्ट्र सरकारचा सेंद्रिय शेती भूषण पुरस्कारही मिळाला आहे. मंत्री आपल्या शेतात नेहमीच वेगवेगळे प्रयोग करत असतात. सुगंधी औषधी वनस्पती जिरेनियम लागवड, विक्रमी उत्पादन येणारे बेडवरील सोयाबीन, गोपालनातून संपूर्ण शेतीचे सेंद्रियकरण करुन त्यांनी कमी खर्चात चांगले उत्पादन घेतले आहे. शेतकऱ्यांनी आपल्या असलेल्या शेतीत विविध फळ पिकाची लागवड करुन ती सेंद्रिय पद्धतीने पिकवली तर नक्की शेतकरी आपलं आर्थिक उत्पन्न वाढवू शकतात असेही मंत्री म्हणाले.


पारंपरिक पिकांना बगल, शेतकऱ्यांनी बाजारात मागणी असलेल्या पिकांची लागवड करावी


मंत्री यांनी रासायनिक खतं किंवा कीटकनाशकांचा वापर केला नाही. त्यांनी संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने खरबूज पीक घेतले आहे. त्यांनी कमी खर्चात जास्त उत्पन्न घेऊन आपले आर्थिक गणित सुधारले आहे. शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांना बगल देत बाजारात मागणी असलेल्या पिकांची लागवड करावी. त्याला नियोजनाची जोड देऊन योग्य बाजारपेठेत विक्री केली तर कमी कालावधीत चांगले उत्पन्न घेता येत असल्याचे राधेश्याम मंत्री म्हणाले.


महत्त्वाच्या बातम्या:


Maharashtra Agriculture News : 25 वर्षाच्या शेतकऱ्याची कमाल, सव्वा एकरात पपईतून 23 लाखांचं उत्पन्न, वाचा कुंडलच्या प्रतिकची यशोगाथा