Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगर शहराला दरवाज्यांचं शहर (Gates City) म्हणून ओळखले जातात. मात्र असे असताना शहरातील ऐतिहासिक 52 दरवाज्यांपैकी अनेक दरवाज्यांची दूरवस्था झालेली आहे. त्यामुळे यापैकी महत्वाचे दरवाजे दुरुस्त करण्याचे काम स्थानिक प्रशासनाने हाती घेतले होते. दरम्यान ऐतिहासिक पानचक्कीलगत असलेल्या मेहमूद दरवाज्याचे देखील काम सुरु होते. त्यामुळे गेल्या वर्ष-दीड वर्षापासून हा दरवाजा बंद होता. मात्र अखेर प्रशासनाने रविवारी (26 फेब्रुवारी) हा दरवाजा आता खुला केला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक आणि वाहनधारकांनी आनंद व्यक्त केला आहे.
वाहनाच्या धडकेमुळे दरवाजाचे नुकसान, दुरुस्तीमुळे दरवाजा वर्षभरापासून बंद
काही दिवसांपूर्वी वाहनाच्या धडकेमुळे ऐतिहासिक मेहमूद दरवाजाचे नुकसान झाले होते. त्यामुळे दुरुस्तीचे काम मनपा प्रशासनाच्यावतीने हाती घेण्यात आले होते. मात्र नियोजित वेळेत हे काम झाले नाही. काही ना काही कारणांमुळे या कामाला विलंब होत गेला. घाटी रुग्णालयाला जाण्यासाठी हा सर्वात जवळचा मार्ग आहे. मात्र दुरुस्तीच्या कामामुळे हा रस्ता सुमारे वर्षभरापासून बंद होता. त्यामुळे रुग्णाला घाटीत घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिकांना मिलकॉर्नर, ज्युबिली पार्कमार्गे जावे लागत होते. आता मेहमूद दरवाजाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्याने हा फेरा वाचणार आहे. शिवाय छावणीमार्गे, वेरुळ लेणी, बीबी का मकबरा आदी पर्यटनस्थळांना भेटी देणाऱ्या पर्यटकांना दिलासा मिळाला आहे.
जड वाहनांना प्रवेशबंदी
मोठ्या जड वाहनांनी दरवाजाची वाताहत केली होती. त्यामुळे मनपा प्रशासाने दरवाजातून जड मोठ्या वाहनांवर बंदी घातली. तर यासाठी दरवाजाच्या दोन्ही बाजूने लोखंडी रॉड लावण्यात आले आहेत. तर छावणी, भावसिंगपुरा, विद्यापीठ, बेगमपुरा, पहाडसिंगपुरा भागातील नागरिकांना ये-जा करण्यासाठी सध्या एकमेव बारापुल्ला येथील रस्ता सुरु होता. टाउन हॉल ते मकाई गेट रस्त्याचे काम सुरु असल्याचे हा रस्ताही बंद आहे. त्यामुळे महेमूद दरवाजा सुरु झाल्याने वाहनधारकांनी आनंद व्यक्त केला.
काँग्रेसने केली होती दुरुस्तीची मागणी
काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष मोहम्मद हिश्याम उस्मानी यांनी महेमूद दरवाजाच्या दुरुस्तीची मागणी केली होती. यासाठी त्यांनी तत्कालीन पालकमंत्री सुभाष देसाई, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, महापालिका प्रशासक अस्तिककुमार पाण्डेय यांना पत्रव्यवहार करुन ऐतिहासिक दरवाजाची दुरुस्तीची मागणी केली होती. त्यानंतर या कामाला सुरुवात झाली होती. तर मागील सहा महिन्यांपासून दरवाजाचे दुरुस्तीचे काम सुरु होते. तर काम पूर्णत्वास आल्याने वाहतूक खुली केल्याने हजारो वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
वेरुळ-अजिंठा महोत्सव! दुसऱ्या दिवशी छत्रपती संभाजीनगरवासियांना मिळाली संगीताची मेजवानी