Maharashtra Agriculture News : राज्यात बोगस बियाणे, खते, कीटकनाशके यांची विक्री करणाऱ्या काही जणांवर अलीकडे कारवाई झाली आहे, मात्र बोगस बियाणे-औषधे विक्री करणाऱ्यांविरोधातील अधिक कडक कायदा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. तर चालू पावसाळी अधिवेशनातच (Monsoon Session) बोगसगिरी करणाऱ्यांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याचा अधिक कडक कायदा अस्तित्वात आणला जाईल, अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी आज मुंबई येथे पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाचे कामकाज संपल्यानंतर माध्यमांशी बोलताना दिली आहे.


ज्याप्रमाणे बीटी-कापूस बियाण्यांच्या बाबतीत बोगस बियाणे वितरित करणाऱ्यांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल होतो, त्याच धर्तीवर तोच कायदा अन्य बियाण्यांच्या, खतांच्या व कीटक नाशकांच्या बाबतीतही लागू करण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आला असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले. तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात संपन्न झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला असून, त्यासाठी एक विशेष समितीही स्थापन करण्यात आली असल्याची माहिती धनंजय मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.


चालू पावसाळी अधिवेशनातच कायदा लागू होणार 


प्रत्येक हंगामात शेतकऱ्यांची बोगस बियाणे देऊन फसवणूक करण्यात आल्याच्या घटना समोर येत असतात. दरम्यान मागील काही दिवसांत कृषी विभागाने केलेल्या कारवाईतून देखील बोगस बियाणे विक्रीचे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे आता विक्री करणाऱ्यांविरोधातील अधिक कडक कायदा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. दरम्यान असा कायदा अस्तित्वात आणण्यासाठीचे प्रारूप तयार करण्याचे काम सुरू असून, समितीचा निर्णय होताच, चालू पावसाळी अधिवेशनातच हा कायदा लागू करण्यात येईल, असेही धनंजय मुंडे म्हणाले.


बाळासाहेब थोरातांनी सभागृहात उपस्थित केला मुद्दा 


पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरवात झाली आहे. दरम्यान पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांच्या मुद्यावरून अधिवेशन गाजले. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी शेतकऱ्यांच्या मुद्दा उपस्थित करत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. राज्यातील पावसाची स्थिती गांभीर्याने पाहायची गरज असून, अद्याप 50 टक्के क्षेत्रात पाऊस झालेला नाही. शेतकरी हवालदिल झाला असून, अतिवृष्टी, गारपीट नुकसानीचे अनुदान अजूनही मिळाले नाही. त्यातच बियाणे, खते मोठ्या प्रमाणात बाजारात आलेत. तर सरकारी टोळी हफ्ते वसुली करतायेत, असा आरोप थोरात यांनी केला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Maharashtra Assembly Monsoon Session : राष्ट्रवादीच्या फुटीनंतरही विधानसभेतील बैठक व्यवस्था पूर्वीप्रमाणेच