Maharashtra Assembly Monsoon Session : राष्ट्रवादी काँग्रेसमधील (NCP) फुटीनंतरही विधानसभेतील बैठक व्यवस्था पूर्वीप्रमाणेच असणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याचा विधीमंडळात अद्याप अधिकृत निर्णय नाही. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) पूर्वीप्रमाणेच आसन व्यवस्था ठेवणार आहेत. मात्र काही आमदार सत्ताधारी आमदारांच्या शेजारी तर काही आमदार विरोधी पक्षांच्या आमदारांच्यासोबत बसण्याची व्यवस्था आहे. त्यामुळे किती आमदार अजित पवार (Ajit Pawar) आणि किती आमदार शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबत आहेत याचं चित्र स्पष्ट होईल. महाराष्ट्र विधानसभा सभागृहात 304 आमदार बसण्याची आसन व्यवस्था आहेत तर विधानसभेचे 288 सदस्य आहेत.


पावसाळी अधिवेशन कोण गाजवणार?


दरम्यान अजित पवार यांनी 2 जुलै रोजी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला. अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर पहिल्यांदाच विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होत आहे. हे पावसाळी अधिवेशन विरोधक की सत्ताधारी यापैकी नेमकं कोण गाजवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.


नवा विरोधी पक्षनेता नेमका कोण?


महाराष्ट्राच्या विधानसभेचं अधिवेशन अवघ्या एक दिवसावर आलं आहे आणि विरोधी पक्षनेतेपदाचं नेमकं काय होणार याचा पेच कायम आहे. महिनाभरापूर्वी विरोधी पक्षनेते असलेले अजित पवार आता उपमुख्यमंत्री आहेत. त्यानंतर राष्ट्रवादीने निवडलेले जितेंद्र आव्हाड यांच्या नावावर विधानसभा अध्यक्षांनी शिक्कामोर्तब केलेलं नाही आणि तिसरीकडे काँग्रेस संख्याबळाच्या आधारावर आता आपलाच दावा करत आहे. त्यामुळे राज्याचा नवा विरोधी पक्षनेता नेमका कोण हेच अजून ठरायचं आहे. 


काँग्रेस विरोधी पक्षनेतेपदावर दावा करणार?


विरोधी बाकांवर ज्या पक्षाचं संख्याबळ सर्वाधिक, त्या पक्षाचा विरोधी पक्षनेता बनतो. राष्ट्रवादीत शरद पवार गटाने सुरुवातीला केवळ नऊच आमदार ज्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली त्यांच्याविरोधात अपात्रतेची कारवाई सुरु केली. पण आता राष्ट्रवादीने आणखी 12 जणांविरोधात कारवाईची मागणी केली आहे. म्हणजे एकूण 21 आमदार सोडून गेल्याचं शरद पवार यांचा गट अधिकृतपणे मान्य करत आहे. या स्थितीत 44 जागा असलेला काँग्रेस पक्ष हाच विरोधी पक्षनेतेपदासाठी दावा करु शकतो. राष्ट्रवादीत कुठला गट अधिकृत, कुठला गटनेता अधिकृत यासाठीची याचिका अध्यक्षांसमोरच आहे. त्यावर ते यथावकाश निर्णय देतील. पण त्याआधी काँग्रेसने गटनेते पदावर दावा केल्यास त्यावर त्यांना निर्णय घ्यावा लागेल. 


हेही वाचा


Maharashtra Politics : राज्यात विरोधी पक्षनेतेपदाचा पेच अधिवेशनाआधी सुटणार का?