Aurangabad News : एकीकडे औरंगाबाद महानगरपालिकेत (Aurangabad Municipal Corporation) पहिल्या टप्प्यात 123 कर्मचाऱ्यांची भरती करण्याच्या हालचाली सुरू असतानाच, दुसरीकडे मात्र कंत्राटी कर्मचारी कपात करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. महापलिकेच्या आकृतीबंधानुसार आवश्यक तेवढेच कर्मचारी कंत्राटी तत्त्वावर घेणे आवश्यक असताना, मागील काही वर्षात सर्वच विभागात अतिरिक्त कंत्राटी कर्मचारी घेण्यात आले. त्यामुळे त्यांच्या वेतनावर दरमहा मनपाला लाखोंचा भुर्दंड सहन करावा लागतो. अशी सर्व परिस्थिती लक्षात घेता मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी यातील 200 कंत्राटी कर्मचारी कपातीचा निर्णय घेतला असून, त्यामुळे दरमहा 35 लाखांची बचत होणार आहे.


महापालिकेत अनेक वर्षांपासून कर्मचारी भरती प्रक्रिया झालेली नाही. त्यामुळे रिक्त पदांची संख्या वाढली असून प्रत्येक अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांवर कामांचा ताणही वाढला आहे. त्यामुळे मागील काही वर्षांपासून मनपाने कंत्राटदार नियुक्त करून त्याद्वारे मनुष्यबळ उपलब्ध करण्यास सुरुवात केली. सहा वर्षात मनपात कंत्राटी कर्मचाऱ्यांची संख्या सुमारे दीड हजारांवर पोहचली आहे. यात अनेक विभागात अतिरिक्त मनुष्यबळ घेत मनपाच्या तिजोरीवर भर टाकण्यात आला.


कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या कपातीमुळे 35 लाख रुपये दरमहा वाचणार


दरम्यान, गेल्या महिन्यात कंत्राटी कर्मचाऱ्यांचा आढावा आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत यांनी घेतला. त्यात अनेक विभागात अतिरिक्त कंत्राटी कर्मचारी असल्याचा हा प्रकार आढळून आला. प्रशासकांनी सर्व विभागांना आकृतीबंधापेक्षा अतिरिक्त असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्याची आकडेवारी सादर करण्याचे आदेश दिले. त्यानुसार सर्व विभागांनी आकडेवारी सादर केली. त्यात पहिल्यांदा 209 कर्मचारी अतिरिक्त आढळले. ते सर्व कमी करण्याचे आदेश प्रशासकांनी दिले आहे. मात्र रात्रीतून यात बदल झाला. हे कंत्राटी कर्मचारी चांगले काम करीत असल्याचे प्रशासनाच्या वतीने आयुक्तांना सांगण्यात आले. त्यावरून या कर्मचाऱ्यांच्या कपातीला ब्रेक देण्यात आला. परंतु, लागलीच पुन्हा काही विभागांकडून आकडेवारी मागविण्यात आली. त्यात अतिरिक्त कर्मचारी 200 असल्याचे आढळून आले. त्यावरून प्रशासकांनी हे सर्व कंत्राटी कर्मचारी कपात करावेत, असे आदेश दिले. या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या कपातीमुळे मनपाचे 35 लाख रुपये दरमहा बचत होणार असल्याचेही मनपा प्रशासनाद्वारे सांगण्यात आले आहे.


नवीन 123 कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार...


एकीकडे कंत्राटी कर्मचाऱ्यांना काढण्याचा आदेश आयुक्तांनी दिला आहे, तर दुसरीकडे वेगवेगळ्या विभागात असलेले रिक्त पद भरण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. ज्यात युद्धपातळीवर पहिल्या टप्प्यात 123 कर्मचाऱ्यांची भरती करण्याचे निश्चित करण्यात आले. या संदर्भातील जाहिरात लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील यांनी दिली. तर महापालिकेला मोठ्या मोठ्या प्रमाणात कर्मचारी भरती करावी लागणार आहे. त्यासाठी शासनाकडे मंजुरीसाठी सुधारित प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचे प्रशासक जी. श्रीकांत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.


इतर महत्वाचे बातम्या: 


'बाबा, मला माफ करा, मी तुमचे पैसे गमावले'; सुसाईड नोट लिहून कर्जबाजारी अभियंत्याची गळफास घेऊन आत्महत्या