मुंबई : राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांची (Maharashtra SSC Exam Result) परीक्षा न घेता पास करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र दहावी निकालासाठी विविध परीक्षा मंडळांकडून शाळास्तरावर होणारे अंतर्गत मूल्यमापन लक्षात घेता अकरावी प्रवेशासाठी एकवाक्यता राहावी व सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळावी यासाठी वैकल्पिक(optional) सामाईक प्रवेश परीक्षा(CET) जुलै महिनाअखेर किंवा ऑगस्टचा पहिला आठवडा आयोजित केली जाणार आहे. जुलै अखेर किंवा ऑगस्ट पहिल्या आठवड्यात घेण्यात येणारी अकरावी सीईटी परीक्षा नेमकी कशी असणार ? याबाबत जाणून घेऊयात...


 शालेय शिक्षण विभागानं या सीईटी संदर्भात एक शासन निर्णय आज जारी केला आहे. अकरावी प्रवेशासाठी ची सीईटी परीक्षा ही विद्यार्थ्यांसाठी पूर्णतः ऐच्छिक असणार आहे. सीईटी परीक्षा ही दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. सदर परीक्षेचे प्रश्नपत्रिकेमध्ये इंग्रजी, विज्ञान,गणित व सामाजिक शास्त्र या विषयांवर प्रत्येकी 25 गुणांचे प्रश्न असतील. परीक्षा ऑफलाईन घेण्यात येईल प्रश्नपत्रिकेचे स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे असतील.परीक्षा ही ओएमआर पद्धतीने घेतली जाईल. 


सीईटी परीक्षा 100 गुणांची असेल आणि त्यासाठी एकच प्रश्न पत्रिका पेपर असेल परीक्षेचा कालावधी दोन तासांचा असेल. सामाईक प्रवेश परीक्षा ही शिक्षण आयुक्त यांच्या देखरेखीखाली महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ व  महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत आयोजित करण्यात येईल.  परीक्षेसाठी परीक्षा केंद्रांची यादी राज्य मंडळ परीक्षा परिषदेमार्फत घोषित करण्यात येईल


अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा ही पूर्णतः ऐच्छिक असल्याने इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर राज्य मंडळ व परीक्षा परिषदेमार्फत पोर्टलवर विद्यार्थ्यांसाठी परीक्षेला प्रविष्ठ होण्यासाठीचा पर्याय उपलब्ध करून देईल. 2020 21 या शैक्षणिक वर्षासाठी दहावीच्या परीक्षेला प्रविष्ट झालेल्या राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांनी दहावी परीक्षेसाठी शुल्क अदा केलेले असल्याने अशा विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षेसाठी शुल्क भरावे लागणार नाही. शिवाय सीबीएससी आयसीएससी व इतर मंडळांच्या विद्यार्थ्यांना या सीईटी परीक्षेसाठी राज्य मंडळाकडून परीक्षा परिषदेकडून शुल्क घेण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षण विभागानं दिली आहे.