अहमदनगर: विकासाचे रोल मॉडेल म्हणून देशभरात प्रसिध्द असलेल्या राळेगण सिध्दीत निवडणुकीच्या निकालानंतर विजयी उमेदवारांनी चक्क डीजेच्या दणक्यात जल्लोष केल्याचं पहायला मिळतंय. विजयी उमेदवारांनी प्रचंड जल्लोषात मिरवणूक काढली.
राळेगण सिध्दीत आतापर्यंत ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध व्हायची. पण या वेळी नऊ जागांपैकी केवळ दोन जागा बिनविरोध झाल्या आणि उर्वरित सात जागांसाठी निवडणूक लागली होती. त्यामध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी समर्थन केलेल्या पॅनेलचा विजय झाला.
निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मात्र विजयी उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा करण्यास सुरुवात केली. डीजेच्या साथीवर त्यांनी 'यारो मैने पंगा ले लिया', 'आता कसं वाटतंय' या गाण्याच्या तालावर ठेका धरला. काही कार्यकर्ते तर थेट जेसीबीच्या पंजात जाऊन जल्लोष करत होते. राळेगणसिध्दी गावातील नागरिकांसाठीच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रासाठी हे चित्र अनपेक्षित होतं. अनेकांनी यावर आश्चर्यही व्यक्त केलं.
पंढरपुरातल्या देवडेत 85 वर्षांच्या कलावती आज्जींची व्हिक्ट्री, विजयानंतर म्हणाल्या...
आधी समर्थन, नंतर नाराजी
विजयी उमेदवारांनी डीजेच्या दणक्यात मिरवणूक काढल्यानंतर अण्णा हजारेंनी सुरुवातीला त्याचं समर्थन केलं. ते म्हणाले की, "राज्यात सर्वत्र मिरवणूक काढण्यास बंदी नाही म्हणून राळेगणसिद्धीमध्ये मिरवणूक काढली." अण्णांच्या या प्रतिक्रियेवर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केल्यानंतर मात्र त्यांनी डीजेच्या दणक्यातील मिरवणुकीवर नाराजी व्यक्त केली. कोणाचा तरी अवमान होतो म्हणून गावात विजयी मिरवणूक काढायला नको असे ते म्हणाले.
अण्णा हजारे म्हणाले की, "काही लोक केवळ विरोधाला विरोध करायचा म्हणून निवडणुकीला उभे राहतात. गावातील निवडणूक बिनविरोध होवू द्यायची नाही यासाठी निवडणूक लादण्यात आली. पण इतर गावं आणि राळेगणसिद्धी या गावात फरक आहे. मतभेद होतील पण गावातील वातावरण दूषित होणार नाही."
जे काम करतात तेच निवडूण येतात
ते पुढे म्हणाले की, "पोपटराव पवार यांनी काम केलं म्हणून हिवरे बाजारच्या निवडणुकीत ते निवडून आले. पोपटराव पवार यांनी राळेगणसिद्धी मधून प्रेरणा घेतली आणि राळेगणसिद्धीच्या दोन पावले पुढे काम केलं. राजकीय पक्ष विजयाचे दावे करतात मात्र विकास काम होत नाहीत. लोक शिक्षण आणि लोक जागृतीचा अभाव अजूनही आहे. निवडणुकीत प्रलोभने दाखविण्याचे प्रकार चुकीचे असल्याचे सांगत त्यांनी निवडणुकीत साड्या वाटणाऱ्या उमेदवारांवर टीका केली."
आंदोलनास पाठिंबा हा मोदींचा स्वार्थ
अण्णा हजारे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना म्हणाले की, "काँग्रेसचे सरकार असताना माझ्या आंदोलनाला मोदींनी पाठिंबा होता. मोदी आधी माझे गुणगान गात होते, त्यांचा स्वार्थ होता. काँग्रेसचे सरकार जाऊन आपले सरकार यावे यासाठी मोदींनी माझा आंदोलनाला पाठिंबा दिला होता. मात्र आता मोदी सूडबुध्दीने वागत आहेत. प्रत्येक राजकीय पक्षाने माझा आंदोलनाचा फायदा घेतला."
केंद्र सरकारच्या धोरणा विरोधात 30 तारखेला आंदोलन करणार असल्याचं सांगत अण्णा हजारे म्हणाले की, "दिल्लीत जागा मिळाली तर दिल्लीत आंदोलन करण्यात येईल. अन्यथा राळेगणसिद्धीमध्ये आंदोलन करणार."
पहा व्हिडीओ: Gram Panchayat Election Results | अण्णा हजारेंच्या राळेगणसिद्धीमध्ये डीजेच्या दणदणाटीत विजयाचा जल्लोष
जळगावात तृतीयपंथी अंजली पाटील यांचा विजय, उमेदवारी अर्ज बाद केल्यानंतर आल्या होत्या चर्चेत