जळगाव : जळगाव जिल्ह्यातील भादली ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये तृतीयपंथी अंजली पाटील यांनी विजय मिळवला आहे. त्या जळगाव जिल्ह्यातील त्या पहिल्या तृतीयपंथी विजयी उमेदवार ठरल्या आहेत. भादली बुद्रुक ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अंजली यांनी वॉर्ड क्रमांक चारमधून सर्वसाधारण महिला प्रवर्गातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पण, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांच्या उमेदवारी अर्जावर हरकत घेऊन तो बाद केला होता. तृतीयपंथी असल्याने त्यांना महिला प्रवर्गातून उमेदवारी करता येणार नाही, मतदार यादीतही त्यांच्या नावापुढे लिंगाचा उल्लेख 'इतर' असा असल्याने त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली होती. मात्र, अंजली यांनी हार मानली नाही. त्यांनी आपली सहकारी तृतीयपंथी शमिभा पाटील यांच्या मदतीने न्यायासाठी थेट उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे दार ठोठावले. या ठिकाणी कायदेशीर बाजू मांडल्याने त्यांना न्याय मिळाला. न्यायालयाने त्यांच्या उमेदवारीला हिरवा कंदील दिला. म्हणून शेवटी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना त्यांची उमेदवारी मान्य करावी लागली. गावाचा विकास हाच त्यांचा ध्यास असेल असं त्यांनी या विजयानंतर सांगितलं.


विजयानंतर वंचित बहुजन आघाडीच्या शमिभा पाटील यांनी म्हटलं आहे की, अंजली पाटील या बहुमताने विजयी झाल्या आहेत. हा वंचित बहुजन आघाडीचा आणि वंचित घटकांचा विजय आहे. या लढाईत ज्यांनी ताकत आणि बळ दिलं त्या सर्वांचे आभार असं शमिभा पाटील यांनी विजयानंतर म्हटलं आहे.


अंजली पाटील यांनी अर्ज भरल्यानंतर त्यांच्या अर्जावर हरकत घेऊन तो बाद करण्यात आला होता. यामुळे संतप्त झालेल्या तृतीयपंथीयांनी संताप व्यक्त करत तहसीलदार कार्यालयात गोंधळ घातला होता. तृतीयपंथी असल्याने त्यांना सर्वसाधारण महिला प्रवर्गातून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार नाही, असा खुलासा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिला होता. या कारणावरून अंजली पाटील यांनी संताप व्यक्त केला होता.


अंजली पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद केल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या सहकारी तथा वंचित बहुजन युवा आघाडीच्या राज्य कार्यकारिणी सदस्या शमिभा पाटील यांनी तहसील कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना जाब विचारत गोंधळ घातला होता. एका तृतीयपंथीने सर्वसाधारण महिला प्रवर्गातून निवडणूक लढवू नये, याबाबत राज्य निवडणूक आयोगाचा काही निर्णय आहे का? असेल तर तसे लेखी द्यावे, अशी मागणी शमिभा पाटील यांनी केली होती जोवर अंजली पाटील यांच्या निवडणूक अर्जाविषयी योग्य तो निर्णय होत नाही, तोपर्यंत आपण तहसील कार्यालयातून हलणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला होता. त्यामुळे अधिकाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली होती. त्यानंतर शमिभा पाटील यांच्या मदतीने अंजली पाटील यांनी न्यायासाठी थेट उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे दार ठोठावले. या ठिकाणी कायदेशीर बाजू मांडल्याने त्यांना न्याय मिळाला. आता जनतेनेही त्यांच्या गळ्यात विजयाची माळ टाकली आहे.