Solapur News : महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यातील लाखो भाविकांचे असलेल्या हुलजंती (ता. मंगळवेढा) येथे महालिंगराया व बिरोबा पालखी भेट सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. भाविकांनी महालिंगराया बिरोबाच्या नावानं चांगभलं या गजरात मुक्तहस्ताने भंडारा ,खारीक व लोकरची उधळण करत मोठ्या भक्तीमय वातावरणात उत्साह संपन्न झाला.
गेल्या आठवड्याभरापासून हा ऐतिहासिक सोहळा सुरू आहे. दररोज लाखोच्या संख्येने भाविक हुलजंती येथे दाखल झाले होत होते. मंगळवारी पहाटेपासून ऐतिहासिक महत्त्व असलेल्या मुंडासचे दर्शन घेण्यासाठी लांबच लांब भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. जगातील एकमेव ठिकाण स्वर्गातून शंकर-पार्वती महालिंगरायाच्या मंदिराला पंच शिखराला मुंडास (आहेर) बांधले जाते. हे मुंडास मध्यरात्री शंकर व पार्वती यांच्या कृपेने होत आहे. या मुंडासचे दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने दाखल झाले होते.
गुरु बिरोबा-महालिंगराया यांच्या पालखी भेट सोहळ्यासाठी नयनरम्य दर्शनासाठी मंदिराच्या बाजूने वाहत असलेल्या ओढ्यात गर्दी झाली होती. यावेळी ढोल कैताळ नगाराच्या गजारात आकाशात भंडारा व लोकरची उधळण करत बिरोबा महालिंगरायाच्या नावानं चांगभले या जयघोषत पालखी भेट सोहळा पार पडला. दरम्यान यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
या गुरू शिष्याच्या नयनरम्य भेट सोहळ्या अगोदर सात पालख्यांचा भेटीचा मान आहे. सोन्याळ (ता. जत) येथील विठुराया, उटगी येथील भरमदेव, चडचण येथील शिरडोन येथील बिरोबा यासह अन्य देवाच्या पालख्यांचा भेट सोहळा पार पडला.
एक महान चरित्र नायक मराठी भुमीमध्ये जन्म घेऊन सर्व भाषेच्या सीमा पार करून कन्नड मराठी, तेलगू लोकांच्या मनावर आजतागायत निर्विवाद अधिराज्य गाजवतो. याची अनुभूती या यात्रेत गेल्यानंतर मिळते. महालिंगरायाच्या भक्तीचा महिमा डंका महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश या राज्यात आहे.गेल्या दोन वर्षानंतर विना निर्बंध यात्रा होत असल्याने भाविकांच्या उत्साह पाहायला मिळाला.
इतर महत्वाच्या बातम्या