बीड: भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची पक्षात कोंडी होत असल्याचं चित्र असल्याचं गेल्या तीन-चार वर्षांपासून दिसतंय. खुद्द पंकजा मुंडे यांनीही अनेकदा याबाबत आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली आहे. भाजपने त्यांना केंद्रीय स्तरावर पक्ष संघटनेत महत्त्वाचे पद दिले, पण त्यावर त्या समाधानी नाहीत. परंतु त्यांचे मानसबंधू आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी मात्र त्यांना सासुरवास सहन करायचा सल्ला देत वेळ पडली तर आपल्या भावाचा पक्ष असल्याचे सांगितले. यामुळे राजकीय क्षेत्रात अनेकांच्या भुवया उंचावल्या.
आपल्या वेगवेगळ्या वक्तव्यामुळे पंकजा मुंडे सध्या चर्चेत आहेत. भाजपमध्ये अस्वस्थ असल्याने कधी एकनाथ खडसे त्यांना राष्ट्रवादीचा मार्ग दाखवतात तर कधी कोणी शिवसेनेकडे अंगुली निर्देश करतो. पंकजा मासबेस लीडर असल्याने त्यांचा पक्षाला फायदा होईल असा प्रत्येकाचा हेतू आहे. तसेच त्या गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या असल्याने त्यांच्या पक्षांतराने भाजपलाही हादरा बसेल असंही समजलं जातंय. या विचाराने सध्या सर्वच राजकीय पक्ष पंकजाच्या पुढील वाटचालीवर लक्ष ठेऊन आहेत. मात्र पंकजा मुंडे यांचेचे मानसबंधू असलेल्या महादेव जानकर यांनी त्यांना सासुरवास सहन करण्याचा सल्ला दिला आहे.
पंकजा या प्रगल्भ असून भाजपच्या त्या मोठ्या नेत्या तथा सचिव असल्याचे जानकर म्हणाले. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत फेटा बांधणार नाही हे पंकजाचे वक्तव्य मंत्रिपदाच्या कार्यकाळात असल्याची आठवण जानकर यांनी यावेळी करून दिली. तर पंकजा मुंडे ज्या पक्षात आहेत तिथे त्यांनी सुखी राहावे, प्रसंगी सासुरवास सहन करावा आणि सासुरवास सहनच झाला नाही तर भावाचा पक्ष असल्याचे जानकर म्हणाले आहेत. अप्रत्यक्षपणे जानकर यांनी आपल्या बहिणीला भाजपातच राहण्याचा सल्ला दिल्याचे त्यांच्या या वक्तव्यावरून दिसतंय.