सोलापूर : संपूर्ण जून महिना गेला आणि जुलै अर्ध्यावर आला तरी महाराष्ट्रातील अनेक भागात पावसाचे थेंबही नाहीत. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातल्या काही भागातला शेतकरी पावसाविना हवालदिल झाला आहे. दुष्काळी पट्ट्यात कृत्रिम पावसाच्या चर्चांनी मात्र शेतकऱ्यांच्या आशा काहीशा पल्लवित झाल्या आहेत. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुकतेच जाहीर केले आहे की सोलापूर, औरंगाबाद आणि शेगाव या ठिकाणी कृत्रिम पावसाचे प्रयोग केले जातील. त्यासाठी 30 कोटी रुपयांच्या निधीची तरतूदही करण्यात आली आहे. पावसाचे नेमके स्थळ, काळ, वेळ या बाबी अद्याप कागदावर असल्या तरी साधारण या महिनाअखेरीस कृत्रिम पावसाचा प्रयोग केला जाणार असल्याची माहीती आहे. दरम्यान पावसाच्या या प्रयोगासाठी सोलापूर विमानतळावर दोन विमानं तैनात झाली आहेत. यातील एक विमान हे सीडींगसाठी तर दुसरे विमान निरीक्षणासाठी वापरले जाणार आहे.

राज्य शासनाच्या वतीने जे व्यावसायिक प्रयोग केले जाणार आहेत त्यासाठी औरंगाबाद येथे रडार उभं करण्यात आलं आहे. तर केंद्रशासनाच्या वतीने कृत्रिम पाऊसाचा प्रयोग करण्यासाठी ढगांचा अभ्यास करण्यासाठी सोलापुरात गेल्या दोन-तीन वर्षांपासून निरीक्षण केंद्र उभं करण्यात आलं आहे. पुण्याच्या आयआयटीएममधील संशोधक गेल्या दोन-तीन वर्षांपासून सोलापूरच्या परिसरातील ढगांचा अभ्यास करुन कृत्रिम पाऊस पाडण्यायोग्य वातावरण आहे का? याचा अभ्यास करत आहेत. कायपिक्स नावाच्या राष्ट्रीय प्रयोगाचा हा भाग आहे.

केंद्र शासनाच्या वतीने जे रडार सोलापुरात उपलब्ध आहेत त्याचा वापर करत 83 नमुन्यांचे संकलंन या निरीक्षण केंद्राने अभ्यासले आहेत. हे नमुने तपासले असता सोलापूरच्या सभोवताली 200 किलोमीटर परिसरात कृत्रिम पाऊस पाडण्यास अनुकूल असे ढग असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. या ढगांवर कृत्रिम पावसाची प्रक्रिया केल्यास 5 ते 10 टक्के पाऊस पडू शकेल असे मत शास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे. जर हा पाऊस धरण क्षेत्रात पडला तर नक्कीच फायद्याच ठरु शकेल.

अवर्षणाची झळ सोसत असताना लोकांना कृत्रिम पाऊस पडण्यास अनुकूल वातावरण असल्याचे सांगितल्याने थोडासा दिलासा जरी मिळाला असला तरी हा प्रयोग किती प्रमाणात यशस्वी होणार? याबद्दल वाद आहेत. महाराष्ट्रात 2003 साली कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यात आला होता. त्यासाठी पाच ते सहा कोटी रुपयांच्या निधीची तरतूदही करण्यात आली होती. साताऱ्यातल्या वडूज येथे हा प्रयोग करण्यात आला. या प्रयोगामुळे पावसाचे प्रमाण काही टक्क्यांनी वाढल्याचा दावा प्रशासनामार्फत करण्यात आला होता.

मागील काही वर्षांपासून महाराष्ट्रातील दुष्काळाची स्थिती पाहता पुन्हा एकदा कृत्रिम पावसाचा मुद्दा चर्चेत आला. मागील वर्षी सोलापुरात कृत्रिम पावसाचा प्रयोग करणार असल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र सोलापुरात असलेलं रडार हे भारतीय उष्णप्रदेशीय हवामान संस्थेच्या अभ्यासासाठी असल्याची माहिती तिथल्याच शास्त्रज्ञांनी दिली होती. दोन-तीन वर्ष अभ्यास केल्यानंतर यावर्षी पुढील अभ्यासासाठी सोलापुरात दोन विशेष विमानं दाखल झाली आहेत.

किंग एअर बीचक्रॉफ्ट 200 आणि किंग एअर बीचक्रॉफ्ट सी-90 अशी या दोन्ही विमानांची नावे आहेत. यापैकी एक विमान हे निरीक्षणासाठी वापरलं जाणार आहे, तर दुसरं विमान हे सीडिंगसाठी वापरलं जाणार आहे. दोन्ही विमानं हे कृत्रिम पावासाला लागणाऱ्या तांत्रिक साहित्यांची जोडणी करुन घेण्यात आली आहेत. डीसीडीएची परवानगी मिळताच ही विमानं उड्डाण घेतील. विमानांच्या उड्डाणासाठी तांत्रिक गोष्टींची जुळवाजुळव पूर्ण झाली असून त्यासाठी किमान 30-40 लोकांची टीम काम करत आहे. दोन्ही विमानांचे उड्डाण एक परदेशी आणि एक भारतीय वैमानिक करणार आहेत.

किंग एअर बीचक्रॉफ्ट सी 90 विमानाद्वारे सीडिंग केलं जाणार आहे. प्रत्यक्ष विमानातून उष्ण ढगांच्या पायथ्याशी जाऊन जेथे उर्ध्व स्त्रोत आहे तिथे रासायनिक द्रव्याची फवारणी केली जाणार आहे. ढगांचे आकारमान, पावसाच्या बिंदूचा साठा, ढगांची उंची आणि गती यावरुन सीडिंग प्रक्रिया ठरवली जात असते. दोन्ही विमानात शास्त्रज्ञांची एक टीम देखील असणार आहे. या टीमद्वारे लगेच निरीक्षण नोंद करण्यात येणार असल्याची माहीती शास्त्रज्ञांनी दिली.

दरम्यान तांत्रिक बाबींची पूर्तता झाली असून काही परवानग्यांची आवश्यकता असल्याने अद्याप उड्डाण झाले नसले तरी आठवडाभराच्या आतच या विमानांजे उड्डाण होईल, अशी माहिती शास्त्रज्ञांनी दिली. आता या निरीक्षण आणि प्रयोगानंतर बळीराजाची कृपा होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.