Madha Vidhansabha Election News : विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सर्वच पक्षातील इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. अशातच माढा (Madha) तालुका विधानसभा मतदारसंघाची देखील जोरदार चर्चा सुरु आहे. कारण, महाविकास आघाडीकडून माढा विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसला (Congress) सुटावा ,अशी मागणी करण्यात आली आहे. माढा विधानसभेसाठी राष्ट्रवादीत उमेदवारीसाठी मारामारी सुरु असतानाच आता माढ्याच्या नगराध्यक्षा अॅड. मीनल साठे (Ad. Minal Sathe) या देखील रिंगणात उतरल्या आहेत, त्यांनी त्यांनी सध्या माढ्यात जनसंवाद यात्रेला सुरुवात केली आहे.


महाविकास आघाडीकडून कोण कोण इच्छुक?


माढा विधानसभेची जागा काँग्रेसला सोडावी, अशी मागणी मीनल साठे यांनी केली आहे. यावेळी कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवण्याच्या तयारीला साठे यांनी सुरुवात केली आहे. माढा लोकसभेला राष्ट्रवादी काँग्रेसने मिळवलेल्या मोठ्या मताधिक्यानंतर अनेक दिग्गज सध्या माढ्यातून विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत. यामध्ये महाविकास आघाडीकडून शिवतेजसिंह मोहिते पाटील, विद्यमान आमदार बबनदादा शिंदे यांचे पुतणे धनराज शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय बाबा कोकाटे, संजय पाटील घाटणेकर, राष्ट्रवादी काँग्रेस शिवाजी कांबळे ही मंडळी तिकिटासाठी प्रयत्न करत आहेत.  अशातच आता माढ्याच्या नगराध्यक्षा मीनल साठे यांही देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी दर्शवली आहे. यासाठी त्यांनी माढा तालुक्यात जनसंवाद यात्रा सुरु करत मतदारांशी संवाद सुरु केला आहे.


महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळावी, मिनल साठेंची मागणी


माढ्याची जागा ही काँग्रेसला मिळावी, अशी मिनल साठे यांची मागणी आहे. महाविकास आघाडीकडून आपण निवडणूक लढवायच्या तयारीत असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जेष्ठ आमदार बबनदादा शिंदे यांनीही आपल्या मुलासह काही दिवसापूर्वी शरद पवार यांची भेट घेतल्यामुळे ते स्वगृही परतणार का?  याची चर्चा सुरु असताना आता राष्ट्रवादीकडून इच्छुक असणारे उमेदवारांची संख्याही कमालीची वाढू लागली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या इफेक्टमुळं सध्या माढ्यातून महायुतीच्या तिकिटावर लढण्यास नेते कच खाऊ लागले आहेत. अशावेळी शरद पवारांची तुतारी ही हमखास विजय मिळवून देणारी असल्याचे उमेदवारांना वाटू लागले आहे. त्यामुळं माढ्यातून तुतारी मिळवण्यासाठी अनेक दिग्गज प्रयत्नात आहेत.


माढ्यातून अनेक दिग्गज निवडणूक रिंगणात उतरणार


दरम्यान, आता माढ्याच्या नगराध्यक्षा मीनल साठे विदानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत असून महाविकास आघाडी कडून तिकीट न मिळाल्यास अपक्ष निवडणूक लढवायची या उद्देशाने त्यांनी जनसंवाद यात्रेत सुरुवात केलीय. सध्या मीनल साठे यांच्या यात्रेला जनतेतून चांगला प्रतिसाद मिळत आहे. माढ्याची उमेदवारी कोणालाही मिळाली तरी यंदा माढ्यातून अनेक दिग्गज निवडणूक रिंगणात उतरणार हे मात्र नक्की. अशातच विद्यमान आमदार बब दादा शिंदे हे माढ्यासाठी यंदा आपला मुलगा व दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे यांना रिंगणात उतरवणार आहेत. सध्याची परिस्थिती पाहता रणजित सिंह शिंदे हे देखील महायुतीचे तिकीट न घेता अपक्ष म्हणून लढू शकतात.