कल्याण: कल्याण पूर्वेतील आयडियल शाळेत शिकणाऱ्या 13 वर्षांच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या त्रासाला कंटाळून या विद्यार्थ्याने आत्महत्या (Suicide News) केल्याची माहिती प्राथमिक तपासातून उघड झाली आहे. विघ्नेश पात्रो (वय 13) असे या मुलाचे नाव असून तो आयडियल या शाळेत इयत्ता आठवीत शिकत होता. मृत्यूपर्वी त्याने लिहलेल्या चिठ्ठीत शाळेच्या शिक्षिकेवर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे आता या शिक्षिकेवर कारवाई होण्याची शक्यता आहे. कोळसेवाडी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात असून पुढील तपास पोलिसांकडून सुरु आहे. 


विघ्नेश पात्रो हा आपल्या कुटुंबासह कल्याणमधील चिकणीपाडा या परिसरात वास्तव्याला होता. विघ्नेशचे वडील प्रमोदकुमार पात्रा हे रविवारी कामावर गेले होते. त्यांची पत्नी आणि मुलगी या दोघीही काही कामासाठी घराबाहेर गेल्या होत्या. त्यावेळी विघ्नेशने घरात गळफास लावून आयुष्याची अखेर केली. वडील घरी आल्यानंतर त्याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. विघ्नेशचे वडील कामावरून परतले तेव्हा घराचा दरवाजा आतून बंद होता. वडिलांनी आवाज दिला मात्र काहीच आतून प्रतिसाद मिळाला नाही. घराची खिडकी उचकटून पाहिली असता लोखंडी गजाला लाल ओढणीला लटकलेला विघ्नेशचा मृतदेह दिसल्यानंतर वडिलांनी  टाहो फोडला. परिसरातील नागरिक जमले घराचा दरवाजा तोडून विघ्नेशला खाली उतरून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उशीर खूप झाला होता. त्याच्या मृतदेहाशेजारी एक चिठ्ठी सापडली. 


निरागस विघ्नेशने आत्महत्येपूर्वी चिठ्ठीत काय लिहलं?


विघ्नेश पात्रो याने आत्महत्येपूर्वी लिहलेल्या चिठ्ठीत शाळेतील एका शिक्षिकेचा आणि मुलाचा उल्लेख केला आहे. यामध्ये त्याने म्हटले होते की, 'पप्पा माझ्या जाण्याने तुमचा खर्च कमी होईल. बहिणीवर रागावू नका. त्या शिक्षिका आणि मुलाने चिडविल्याने  मी आत्महत्या करत आहे', असे विघ्नेशने चिठ्ठीत लिहून ठेवले होते. त्यामुळे आता विघ्नेशच्या पालकांनी तक्रार केल्यास आयडियल शाळेतील शिक्षिकेवर तक्रार दाखल होण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या स्थानिक नेत्या कांचन कुलकर्णी यांनी याप्रकरणात उडी घेत पोलिसांना एक निवेदन दिले आहे. या निवेदनात त्यांनी विघ्नेशच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या शिक्षिकेवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यादृष्टीने आता पोलीस तपास करत आहेत. संबंधित शिक्षिकेमुळे शाळेतील अन्य कोणत्या विद्यार्थ्याला त्रास होत आहे का, याचाही तपास होण्याची शक्यता आहे.


आणखी वाचा


गतिमंद लेकराला आईने जीव सोडल्याचं कळलं नाही, चार दिवस मृतदेहाशेजारी बसून राहिला, शेजाऱ्यांना दुर्गंधी येताच...