मुंबई : आकाशात आज तुम्हाला खग्रास चंद्रग्रहण पाहण्याचा योग येणार आहे. तब्बल 103 मिनिटं चालणारं हे या शतकातलं सर्वात दीर्घकालीन चंद्रग्रहण असेल. आज रात्री 11 वाजून 54 मिनिटांनी चंद्रग्रहण लागणार असून यावेळी चंद्राची लालसर छटा दिसेल. यालाच 'ब्लड मून' असंही म्हटलं जातं.


आज (शुक्रवारी) रात्री सुरु होणारं हे ग्रहण उद्या पहाटेपर्यंत चालणार आहे. हे चंद्रग्रहण भारतातील खगोलनिरीक्षकांना दिल्ली, पुणे, मुंबईसह अनेक शहरांमधून पाहता येणार आहे. याशिवाय युरोप, मिडल इस्ट, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, बहुतांश आशिया आणि दक्षिण अमेरिकेतून हे ग्रहण दिसेल.

नुसत्या डोळ्यांनीही चंद्रग्रहण पाहणे सुरक्षित आहे. त्यासाठी फिल्टर वापरण्याची गरज नाही असं तज्ज्ञांनी सांगितलं आहे.

चंद्र लाल का?

एरव्ही आपल्याला सूर्याच्या प्रकाशाने चकाकणारा चंद्र दिसतो. पण आज तो लालसर दिसणार आहे. सूर्याची किरणं पृथ्वीद्वारे अडवली गेल्यामुळे पृथ्वीची सावली चंद्रावर पडेल. मात्र त्या सावलीच्या बाजूला पडणारी किरणं संधीप्रकाशामुळे चंद्रावर पडून पृथ्वीवरुन चंद्र लाल दिसेल.

खग्रास चंद्रग्रहण म्हणजे काय?

ज्यावेळी संपूर्ण चंद्रबिंब पृथ्वीच्या छायेत येते त्याला 'खग्रास स्थिती' म्हणतात. अशावेळी पौर्णिमा असूनही चंद्रबिंब जास्त प्रकाशित न दिसता काळसर, लालसर रंगाचं दिसतं.

पुढील शतकातील सर्वात मोठी खग्रास चंद्रग्रहणे 9 जून 2123 आणि 19 जून 2141 रोजी होणार असून त्यावेळी खग्रास स्थिती एक तास 46 मिनिटे दिसणार आहे.
VIDEO : खग्रास चंद्रगहणाचा योग, ब्लडमूनचं महत्त्व, खगोल अभ्यासक दा. कृ. सोमणांशी बातचित