रायगड : उरणच्या केगाव समुद्रकिनाऱ्यावर सुमारे 9 फूट लांबीचा मृत डॉल्फिन आढळून आला आहे. बुधवारी सायंकाळच्या सुमारास हा डॉल्फिन उरणच्या केगाव किनारपट्टीवर दिसला होता. याबाबत माहिती मिळताच गावकऱ्यांनी मृत डॉल्फिन पाहण्यासाठी समुद्रकिनाऱ्यावर मोठी गर्दी केली होती .


या संदर्भातील माहिती मिळाल्यानंतर वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी मृत डॉल्फिनचा पंचनामा केला. डॉल्फिनचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याबाबत कोणतीही माहिती मिळू शकली नाही.


मृत डॉल्फिनचे शवविच्छेदनही करण्यात येणार आहे. शवविच्छेदनानंतर जवळच या डॉल्फिनला पुरण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिली.


उरणच्या समुद्रकिनाऱ्यावर काही दिवसांपूर्वी सुमारे 40 फुट लांबीचा दुर्मिळ 'ब्ल्यू - व्हेल' मासा मृतावस्थेत आढळून आला होता. तर, गेल्या काही वर्षांपासून अशाच पद्धतीने उरणच्या पश्चिम किनारपट्टीवर मासे, कासव हे मृतावस्थेत आढळून आले, असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे .