Lumpy Skin Disease : कोल्हापूर (Lumpy Skin Disease kolhapur) जिल्ह्यात लम्पी चर्मरोगाचा प्रकोप सुरुच आहे. पशुधनावरील आजाराची टांगती तलवार पाहता शेतकरी सुद्धा धास्तावून गेला आहे. हातकणंगले तालुक्यात लम्पीचा प्रार्दुभाव सर्वाधिक झाला आहे. दुसरीकडे कोल्हापूर शहराला लागून असलेल्या कळंबा कात्यायनीमध्येही प्रकोप वाढत चालला आहे. कळंबा परिसरात गेल्या तीन दिवसांमध्ये लम्पी चर्मरोगाने गाय व बैलाचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेक जनावेरही आजारी असल्याची माहिती समोर आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पशुसंवर्धन विभागाने कळंब्यात वैद्यकीय पथक तैनात केलं आहे. मृत जनावरांचे पंचनामे करून त्यांच्या रक्तांचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. या आजाराने कळंबा परिसरात दोन जनावरे मृत्युमुखी पडली आहेत.


हातकणंगले तालुक्यातही 200 जनावरे बाधित 


दुसरीकडे हातकणंगले तालुक्यातील हुपरी, रेंदाळ व रांगोळीमध्ये लम्पी चर्मरोगाचा मोठ्या प्रमाणावर फैलाव झाला आहे. जवळपास 200 जनावरांना बाधा झाली आहे. आतापर्यंत तालुक्यात 57 जनावरे दगावली आहेत. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पशुधन बाधित होऊन मृत्यूमुखी पडत असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.


शासकीय मदत तोकडी 


दुभत्या जनावरांची किंमत पाहता आणि शासनाकडून लम्पीने बाधित झाल्यानंतर मिळणारी मदत यामध्ये प्रचंड तफावत आहे. त्यामुळे मिळणाऱ्या मदतीवर शेतकऱ्यांचा असंतोष आहे. शासनाकडून बैल मृत झाल्यास 25 हजार, दुभत्या म्हशीला 30 हजार आणि इतर जनावरांना 15 हजार रुपये भरपाई दिली जात आहे. दुसरीकडे शेतकऱ्याच्या गोठ्यातील एखादे पशुधन गमावल्यास त्यांची किंमत मोठी आहे. त्यामुळे मिळणारी मदत ही असून नसल्यासारखी झाली आहे. 


शासकीय पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून अल्प प्रतिसाद 


दुसरीकडे बाधित झालेल्या जनावरास उपाचार करण्यासाठी शासकीय पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना संपर्क केल्यास ते वेळेत हजर होत नसल्याचेही चित्रव आहे. त्यामुळे खासगी डाॅक्टरांकडून उपचार केल्यास आणि दुर्दैवाने मृत्यू झाल्यास ते प्रमाणपत्र ग्राह्य मानले जात नाही अशी दुहेरी अडचण आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या