Kolhapur : खड्ड्यात पडून, रस्त्यावर चिरडून मरा पण आम्ही बांधील नाही, अशी मानसिकताच कोल्हापूर पोलिस आणि महानगरपालिकेनं केली आहे का? अशी परस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर शहरातील फुलेवाडी रिंगरोडवर खड्ड्यात पडून महापालिकेतील अभियंत्याचा आईचा मृत्यू झाला होता. आता या प्रकरणात पोलिसांनी मात्र आईच्या मृत्यूस मुलाला कारणीभूत ठरवून गुन्हा दाखल केला आहे. जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे लोकांनी चिरडून, रस्त्यावरील खड्ड्यात मेलं तरी, चालेल आम्हाला अजिबात विचारणा करायची नाही, असा प्रकारची तालिबानी वृत्ती कोल्हापूरमध्ये राबवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे का? अशी शंका येते.
अभियंत्याची आई रस्त्यावरील खड्ड्यात पडून मृत्यू झाल्याची घटना 11 ऑक्टोबर रोजी घडली होती. यानंतर एबीपी माझाने या प्रकरणाला सर्वप्रथम वाचा फोडताना यासंदर्भात आवाज उठवताना 28 ऑक्टोबर रोजी वृत्त प्रसिद्ध केले होते. यानंतर गेंड्याच्या कातडीच्या प्रशासनाने अवघ्या 24 तासांच्या अपघात झालेल्या रस्त्याचे काम सुरु केले होते. एवढी तत्परता जर अपघात होण्यापूर्वीच दाखवली असती, तर त्या अंभियंत्याच्या आईचा जीव वाचला नसता का? याचा विचार कोल्हापूर पोलिस आणि मनपा प्रशासनातील झारीतील शुक्राचार्यांनी करण्याची गरज आहे.
कोल्हापूर मनपात एका विभागात कार्यरत असणाऱ्या अभियंत्याला आईचा खड्ड्याने अपघात होऊन जीव गेलाने चांगलाच मानसिक धक्का बसला आहे. दिवाळीच्या तोंडावरच हसत्या खेळत्या घरातील आई अशा पद्धतीने निघून गेल्याने अभियंत्यासह कुटुंबीय सुद्धा हबकून गेले आहेत. तरीही त्याच अभियंत्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याने संतापाची लाट उसळली आहे.
महापालिकेच्या कारभाराबद्दल प्रचंड रोष
देशातील कोणत्याच शहरात इतके दरिद्री आणि भिकार रस्ते नसतील इतक्या भयानक रस्त्यांवरून कोल्हापूरकर प्रवास करत आहेत. एका निष्पाप आईचा रस्त्यामधील खड्ड्यात पडून जीव गेल्यानंतरच महापालिकेला रस्ता करण्याची तत्परता कोठून आली? गेल्या अनेक महिन्यांपासून महापालिकेच्या कारभारावरून शिमगा सुरु आहे. दररोज किरकोळ ते गंभीर दुखापत होण्यापर्यंत अपघात शहरांमधील रस्त्यांवर होत आहेत.
खडी, मुरुमाच्या धुळीने डोळे बाद होण्याची वेळ
कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये पाऊस थांबल्याने दिलासा मिळाला आहे. वातावरणात उष्णता जाणवत असल्याने रस्त्यांवरील ओलावा कमी होऊन पुन्हा एकदा धुळ उडण्यास सुरुवात झाली आहे. शहरातील बऱ्याच मार्गावर पॅववर्कसाठी मुरुम आणि खडी पसरण्यात आली आहे. रस्ते वाळल्याने वाहने गेल्यानंतर वाहनांच्या धुळीचे लोट निर्माण होत आहेत. त्यामुळे वाहनधारकांना विचित्र परिस्थितीला सामोरे जावं लागत आहे.
शहरातील खड्ड्यांमुळे दररोज अनेक अपघातही घडत आहेत. शहरातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांकडून प्रशासक कादंबरी बलकवडे यांच्याकडे व्यथा मांडूनही रस्त्यांमध्ये सुधारणा झालेली नाही. चांगले रस्ते कोल्हापूरकरांच्या नशिबीच नाहीत का? असाच काहीसा प्रश्न पडत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या