Loudspeaker Controversy : राज्यात गेल्या काही दिवसांपासून भोंग्यांचं राजकारण पाहायला मिळालं. भोंग्यांवरुन राजकीय वर्तुळात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. पण त्यानंतर पोलीस प्रशासनाकडूनही भोंग्यांबाबतच्या सर्वोच्च न्ययालयाच्या नियमांची कटाक्षानं अंमलबजवणी केली जात असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी जाहीर सभेत बोलताना मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा उपस्थित केला होता. तसेच, मशिदींवरील भोंग्यांचा प्रश्न धार्मिक नाहीतर, सामाजिक असल्याचं सांगत, सरकारला 4 मे पर्यंतचं अल्टिमेटम दिलं होतं. त्यानंतर मात्र ज्या मशिदींवरील भोंग्यांवर मोठ्यानं अजान होईल, त्या मशिदींसमोर हनुमान चालिसा मोठ्या लावू, असा इशारा दिला होता. 


सर्वोच्च न्ययालयाच्या नियमानुसार, सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेतच लाऊडस्पिकरच्या वापरास परवानगी असल्यानं, त्याची आता पोलिसांकडून कटाक्षानं अंमलबजवणी केली जात आहे. यावेळे व्यतिरिक्त लाऊडस्पिकर लावणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कायदेशीर कारवाईचा सपाटा सुरू केला आहे. मुंबई पोलीस रात्री 10 नंतर शहरात ध्वनी प्रदुषण होऊ नये, यासाठी सर्वत्र करडी नजर ठेवून आहेत. 


4 मे पासून आयुक्तांपासून अमंलदारापर्यंत प्रत्येकानं ठिकठिकाणी गस्त घालून मशिद तसेच देवस्थानांमध्ये नियमांचं पालन कशाप्रकारे होतं, याची पाहणी केली. दरम्यानच्या काळात नियमाचे भंग करणारे काही मशिदीमधील इमाम आणि लाऊडस्पिकर हाताळणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


महाराष्ट्र पोलिसांनी सर्व धार्मिक स्थळांना लाऊडस्पीकर वापरण्याची परवानगी घेण्याचे आदेश काढल्यानंतर महाराष्ट्र पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार मे 16 पर्यंत सुमारे 8551 मशिदी आणि 6397 मंदिरांना परवानगी देण्यात आली आहे. मशिदींमध्ये अजानसाठी वापरल्या जाणाऱ्या लाऊडस्पीकरचा मुद्दा मनसे पक्षाने उचलून धरल्यानंतर. महाराष्ट्र पोलिसांनी सर्व धार्मिक स्थळांना सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यास सांगणारा आदेश काढला.


लाऊडस्पीकर वापरणं आणि सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल महाराष्ट्र पोलिसांवर सुमारे 10 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मुंबईतच सुमारे चार गुन्हे दाखल झाले. संपूर्ण महाराष्ट्रात पोलिसांनी एकूण 64 जणांना अटक केली आहे. आकडेवारी पुढे सांगते की, महाराष्ट्र पोलिसांनी सुमारे 4935 प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. कलम 149 सीआरपीसीनुसार सुमारे 9971 लोकांना नोटीस देण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत लाऊडस्पीकरचा वापर करू नये. दिवसांत 55 डेसिबलचा लाऊडस्पीकर वापरावा. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या धार्मिक स्थळांवरही कारवाई करण्यात आली आहे.  


आवाज कमी न झाल्यास मशिदींसमोर हनुमान चालिसा वाजवू, असा अल्टिमेटम मनसेनं 4 मे रोजी दिला होता. मात्र, महाराष्ट्र पोलीस आधी सर्व धार्मिक स्थळांना परवानगी घेण्यास सांगितली. त्यानंतर त्यांनी मशिद आणि मंदिरांवर कारवाई करण्यास सुरुवात केली. जेनेकरुन ज्यांनी लाऊडस्पीकरच्या वापरासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केले होते, त्यांच्यावर ही करवाई झाली आहे.


संपूर्ण घटनेवर पोलिसांचं लक्ष 


4 मे पासून पोलीस आयुक्त, पोलीस सहआयुक्त, अतिरिक्त पोलीस आयुक्त, सर्व पोलीस उपायुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त आणि सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक पहाटे 4 वाजल्यापासून सकळचा नमाज अदा होईपर्यंत गस्त घालत होते. मशीद आणि सर्व धार्मिक स्थळं, अजान किंवा कोणत्याही धार्मिक स्थळांसाठी लाऊडस्पीकर वापरत नाहीत. हे पाहण्यासाठी सर्व पोलीस अधिकारी पहाटे 4 वाजता ऑन ड्युटी असतात. तसेच, सर्वच धार्मिक स्थळांवर लावण्यात येणाऱ्या लाऊडस्पिकरवरील आवाजाचं डेसिबल लेव्हल चेक करण्यासाठी मुंबई पोलीस मोबाइल अॅपच वापर करत आहेत.