Lonar Lake Buldhana : जागतिक दर्जाचं पर्यटन स्थळ असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवराच्या (Lonar crater) पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं  दिसून येतय. या नैसर्गिक घटनेचा कारणही तितकंच महत्वाचं आहे.  गेल्या हजारो वर्षापासून लोणार सरोवरात चोहोबाजूने पाण्याचे झरे वाहत होते. गेल्या दशकात पावसाचं अत्यल्प प्रमाणामुळे हे झरे बंद होते. परिणामी लोणार सरोवरातील पाण्याची पातळी कमी कमी होत गेली. पण या वर्षी सरासरी पावसाचं प्रमाण वाढल्याने लोणार सरोवरातील अनेक झरे प्रवाहित झालेत. सरोवरात मुख्यत्वे पापहरेश्वर ,धारातीर्थ , रामगया आणि सितान्हानी असे झरे आहेत. या वर्षी यातील बहुतांश झरे प्रवाहित झालेत आणि त्यामुळे मात्र या सरोवरापरिसरातील वन्य प्राण्यांना पिण्यासाठी गोड पाणी मिळाले!


2013 पासून होते झरे बंद
सध्या लोणार सरोवरातील पाणी पातळी लक्षणीय वाढली आहे. 2013 नंतर पहिल्यांदाच हे झरे प्रवाहित झाल्याने लोणार सरोवर अभ्यासकांमध्ये ही उत्साह आहे..... नाशिक येथील धरण सुरक्षा विभागाने सरोवराची पाणी पातळी मोजण्यासाठी उपकरनेही पाठविली आहेत. सध्या पाणी पातळी मोठी वाढल्याने सध्या हे उपकरण लावू शकत नसल्याचं वन विभागाचं म्हणणे आहे. काही सरोवर अभ्यासक या बाबतीत भिन्न मत मांडतायत. कुणी म्हणत आहे की, हे झरे प्रवाहित झाल्याने सरोवरातील पाण्याची पातळी वाढली. पण या बाबतीत आम्ही सरोवराचे अभ्यासक व आम्ही लोणारकर परिवाराचे संस्थापक सचिन कापुरे यांना या झरे आणि वाढलेल्या पाणी पातळी बाबतीत विचारलं असता त्यांनी सांगितलं की ,हे हजारो वर्षापासून वाहणारे झरे आहेत, गेल्या दशकात पावसाचं सरासरी प्रमाण कमी झाल्याने हे झरे गेल्या दहा वर्षांपासून बंद होते. गेल्या दोन वर्षात या परिसरात पावसाने चांगली हजेरी लावल्याने भागातील पाणी पातळी वाढल्याने हे झरे प्रवाहित झाले आहेत. शिवाय पाणी पातळी थोडी वाढली असेल पण या झरयांचा आणि पाणी पातळी वाढण्याचा काही संबंध नाही असे ते म्हणाले.


सरोवर परिसरातील वन्यप्राण्यांना मिळणार पिण्याचे गोड पाणी...!
लोणार सरोवरातील पाणी हे हजारो वर्षांपासून आहे, हे पाणी खारे म्हणजे अल्कधर्मी असल्याने कुठल्याही सजीवास हे पाणी पिण्यास योग्य नाही त्यामुळे या सरोवराच्या परिसरातील अभयारण्यात असलेल्या प्राण्यांना पिणाच्या पाण्यासाठी नागरी वस्तीकडे जावे लागत असे . पण आता मात्र सरोवरातील झरे प्रवाहित झाल्याने या वन्यजीवांच्या पिण्याच्या गोड पाण्याची सोय झाली आहे. या परिसरातील पाणी पातळी वाढल्याचं घटना जरी  एक मोठी भौगोलीय घटना मानल्या जात असली तरी या परिसरातील वन्यप्रेमी व भौगोलिक अभ्यासक मात्र आनंदात असल्याच चित्र आहे व या भागात आता पर्यटक मोठ्या प्रमाण यायला सुरुवात झालीये.