Loksabha Election 2024 : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता. परिणामी, विदर्भातही मनसे पूर्ण ताकदिनीशी महायुतीच्या उमेदवाराला विजयी करेल, असा संकल्प विदर्भातील मनसेचे नेते राजू उंबरकर यांनी केला होता. मात्र आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि भाजपमध्ये वादाची ठिणगी पडल्याचे बघायला मिळत आहे. विदर्भात मनसेचे नेते राजू उंबरकर (Raju Umbarkar) यांचा एका रुपयाचाही फायदा या ठिकाणी झाला नाही. त्यामुळे विदर्भातील एकही मतदारसंघ मनसेला मिळणार नाही. असा थेट इशारा वणी मतदारसंघाचे भाजपचे आमदार संजीवरेड्डी बोथकुरवार यांनी दिला आहे. यदाकदाचित आगामी निवडणुकांमध्ये वणी मतदारसंघ मनसेला दिला, तर आम्ही त्याचा प्रचंड विरोध करू.असा आक्रमक पवित्राही भाजपने घेतल्याचे संजीवरेड्डी बोथकुरवार यांनी बोलतांना स्पष्ट केले आहे.  


मनसेचा एका रुपयाचाही फायदा झाला नाही- संजीवरेड्डी बोथकुरवार


राजू उंबरकर यांनी चंद्रपूर आर्णी लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या समर्थनार्थ मनसे प्रचारकार्यात उतरवली होती. मनसेचे नेते राजू उंबरकर यांनी शेकडो कार्यकर्त्यांना घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विजय संकल्प सभेलाही हजेरी लावली होती. शेतकऱ्यांचे प्रश्न आणि वेकोली मध्ये स्थानिकांचे प्रश्न सोडविण्याचे वचन फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून मिळाले असल्याने आणि राज ठाकरे यांनी आदेश दिल्याने मनसे पूर्ण ताकदीनिशी महायुतीच्या उमेदवाराला बहुमताने विजयी करेल,  असा विश्वास राजू उंबरकर यांनी व्यक्त केला होता.


यवतमाळच्या वणी उपविभागात मनसेची मोठी ताकद असून चंद्रपूर मध्येही मनसेचा कार्यविस्तार आहे. त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराला बळ मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र या मतदारसंघात मनसेचा कुठलाही फायदा महायुतीला झाला नसल्याचा आरोप भाजप आमदार संजीवरेड्डी बोथकुरुवार यांनी केला आहे. आगामी विधानसभेमध्ये उमेदवारी देताना भाजपकडून प्रत्येक उमेदवारांचे अवलोकन आणि सर्वे होणार आहे. मागील पाच वर्षातील काम आणि जनमताचा कौल हे ठरवूनच वरिष्ठ उमेदवारी देतील. असेही बोथकुरुवार यांनी बोलतांना स्पष्ट केले आहे. मात्र या मतदारसंघात  मनसेला उमेदवारी देण्यात आली, तर त्याला आमचा विरोध असेल असा थेट ईशाराही संजीवरेड्डी बोथकुरवार यांनी दिला आहे.


तर त्याच्यावरती 24 तासात कारवाई करणार


पुढे बोलताना संजीवरेड्डी बोथकुरवार यांनी काँग्रेसचे खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यावरही निशाणा साधला. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे प्रतिभा धानोरकर हा निवडून आल्या. यावेळी त्यांनी मला भाजपच्या गोटातूनच मदत मिळाल्याने माझा विजय झाल्याचे बोलले होते. यावर भाजपचे आमदार संजीवरेड्डी बोथकुरवार यांनी प्रतिभा धानोरकर यांचे हे कृत्य बालिशपणाचे असल्याचे वक्तव्य केले आहे.


खासदार धानोरकर यांनी ज्या कोणी नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी मदत केली, त्यांचे नावे स्पष्टपणे सांगावे. त्याच्यावरती 24 तासात कारवाई करणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले. मात्र, प्रतिभा धानोरकर यांना खोटे बोलण्याची सवय आहे. त्यांच्या त्या वक्तव्यात फार काही अर्थ नसल्याचे म्हणत प्रतिभा धानोरकरांचा हा दावा  संजीवरेड्डी बोथकुरवार यांनी फेटाळून लावला आहे.   


इतर महत्वाच्या बातम्या