जालना : अंतरवाली सराटीत उपोषणास बसलेल्या मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या उपोषणचा आज 5 वा दिवस असून त्यांची प्रकृती खालावली आहे. राज्य सरकारने सगेसोयरेची अंमलबजावणी करावी, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे, या मागणीसाठी त्यांच्या उपोषणाचा लढा सुरू आहे. लोकसभा निवडणुकांचा (Election) निकाल लागल्यानंतर मनोज जरांगे यांनी 8 जूनपासून उपोषणाला (Agitation) सुरुवात केली. त्यांच्या उपोषणाला आमदार, खासदारांचा पाठिंबा मिळत असून अनेकजण त्यांच्या भेटीसाठी येत आहेत. त्यातच, बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी मध्यरात्री 2.30 वाजता त्यांची भेट घेऊन उपचार घेण्याची विनंती त्यांना केली होती. त्यानंतर, मध्यरात्री जरांगे यांनी सलाईन घेतले. तर, आज दुपारी पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट केली आहे.  


मी शिंदे साहेबांना आणि गृहमंत्री फडणवीस साहेबांना सांगतो की, मी हे उपोषण असंच स्थगित करू शकत नाही. कारण, काही गोष्टी डिटेल्समध्ये माहिती झाल्या पाहिजेत. सगे सोयऱ्याची अंमलबजावणी तुम्ही लगेच करणार आहात का, किती दिवस लागणार आहेत?, केसेस लगेच मागे घेणार की किती दिवसात करणार?, हैदराबादचं गॅझेटला किती दिवस लागेल, हे मला आणि माझ्या समाजाला डिटेल्स पाहिजे, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली.


तर विधानसभेच्या तयारीला लागेल


सगळं क्लेअर झाल्यावर उपोषण स्थगित करायला आम्हाला कुठं अडचण आहे. आम्हाला आरक्षण पाहिजे, बाकी काही नाही पाहिजे. पण तुम्ही असंच खेळवत राहिले तर कदाचित हे माझे शेवटचे उपोषण असेल. कारण, सारखं सारखं उपोषण करायाला मला तरी कुठं वेळ आहे. तुम्ही खेळवत राहिले तर मी आणि माझा समाज डायरेक्ट विधानसभेच्या तयारीला लागेल, असे म्हणत मनोज जरांगे यांनी आपला पुढील प्लॅनच पत्रकार परिषदेतून सांगितला. दरम्यान, सरकारच्यावतीने अद्याप एकही बडा नेता किंवा मंत्री उपोषणस्थळी न आल्यावरुन जरागे यांनी संताप व्यक्त केला. एवढा मोठा विषय मराठ्यांच्या आयुष्याचा आहे ,लांबून गोळ्या मारून होत असतं का ?प्रत्यक्ष चर्चा करूनच होईल माझ्या मते प्रतिक्षा चर्चा करून विषय गोडी गुलाबीने हाताळा उगाच तयारी नका करू जाळं रचून, षडयंत्र रचून असे म्हणत सरकारला लक्ष्यही केलं.


फडणवीस आमचे शत्र नाहीत


मला माझ्या समाजाला आरक्षण पाहिजे ते कोणीही द्या, आमचा शिंदे साहेबांवर, सरकारवर आजही विश्वास आहे. देवेंद्र फडणवीस हे आमचे शत्रू नाहीत, हे मी मागेच सांगितलं आहे. केवळ, ते कार्य करतात ते आपल्याला जमत नाही, जातीच्या आणि आरक्षणाच्या विरोधात बोलले की मी कोणाचे खपवून घेत नाही, त्यांनी हे सर्व बंद करावं ते काय माझे शत्रू आहेत का?, असे म्हणत देवेंद्र फडणवीसांबद्दलही जरांगे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. आमचा सगळ्यांवरतीच विश्वास आहे, आम्हाला आरक्षण द्या, कोणीही द्या, मराठा त्यांना डोक्यावर घेऊन नाचतील. नाटकं मी ऐकून घेणार नाही, आणि मराठ्यांवरील अन्याय मी सहन करणार नाही,  असेही जरांगे यांनी म्हटले.