नागपूर : महाराष्ट्राच्या विधीमंडळात आम्ही एकमेकांचे विरोधक असलो तरी आम्ही एकमेकांचे शत्रू नाही. देशातील अनेक राज्यात मात्र अशी स्थिती नाही. तिथे वेगवेगळ्या पक्षातील नेते एकमेकांचे कट्टर शत्रू आहेत. सुदैवाने महाराष्ट्रात अशी अवस्था नसल्याचं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं.
लोकमतच्या विधीमंडळ सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते. विधीमंडळात गोंधळ झाल्यास ती मोठी बातमी बनते. मात्र, विधीमंडळात होणारे अनेक तासांचे काम एक छोटी बातमी बनते. महाराष्ट्राच्या विधीमंडळात ज्या दर्जाची चर्चा होते, ती देशातील कुठल्याच विधीमंडळात होत नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले.
खरं पाहिलं तर आज राजकीय पक्षांचा अजेंडा वर्तमान पत्र किंवा मीडियाच ठरवतो. कधी-कधी एखाद्या मुद्द्यावर मवाळ भूमिका घेतल्यास प्रसारमाध्यमे ठोकून काढतील या भीतीने सत्ताधारी आणि विरोधक आपापल्या भूमिकेवर अडून बसतात. फक्त माध्यमांच्या भीतीने अनेक वेळा वीधिमंडळात नॉन इश्यूवर दोन-दोन दिवस भांडण चालते. आज राजकीय क्षेत्राबद्दल तक्रार केली जाते त्यासाठी आम्ही 75 टक्के जबाबदार आहोत, तर प्रसार माध्यमे ही 25 टक्के जबाबदार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
माध्यमांनी ठरवले तर राजकीय क्षेत्रात नक्कीच सुधारणा होऊ शकते, असंही मुख्यमंत्री म्हणाले. याच कार्यक्रमात ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी राज्यातील चार प्रमुख पक्षातील चार प्रमुख नेत्यांना (अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, परिवहन मंत्री दिवाकर रावते, विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील) त्यांच्या प्रश्नांनी कोंडीत पकडण्याचे चांगलेच प्रयत्न केले. मात्र, चारही नेत्यांनी कधी थेट उत्तर देऊन तर कधी प्रश्नांना बगल देऊन आपली भूमिका मांडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अधून-मधून काही प्रश्नांवर हजरजबाबी उत्तर देऊन कार्यक्रमात रंगात आणली.
उज्ज्वल निकम यांनी विचारलेले प्रश्न आणि चारही नेत्यांनी त्यांना दिलेली उत्तरं
प्रश्न - निवडणुका जवळ आल्या की अनेक लोक उड्या मारतात, त्यात गुन्हेगार आणि समाजकंटकही असतात.. राजकीय पक्षांनी अशा गुन्हेगारांना सामावून घेणं योग्य आहे का?
मुनगंटीवार - घटनेने सर्वांना निवडणूक लढवण्याचा अधिकार दिला आहे. त्यामुळे कोणताही पक्ष गुन्हा सिद्ध होईपर्यंत त्यांचे अधिकार हिरावून घेऊ शकत नाही.
विखे पाटील - पक्षांनीच आता स्वतःवर आचारसंहिता अमलात आणली पाहिजे.. गंभीर गुन्ह्याच्या आरोपींना कुणीही उमेदवारी देता कामा नये.
जयंत पाटील - गंभीर गुन्हेगारांना उमेदवारीच नकोच...
दिवाकर रावते - आमच्याकडे कार्यकर्त्यांची फळी आहे.. त्यामुळे आम्हाला बाहेरून कार्यकर्ता आणायची गरज भासत नाही... गुन्हेगारही आमच्या पक्षाला घाबरून असतात..
प्रश्न - विधीमंडळ सभागृहात असंस्कृत वागणूक थांबवण्यासाठी उपाय काय?
रामराजे निंबाळकर - जे असंसदीय आहे तेवढेच का जनतेला दिसते याचाही विचार होणे आवश्यक आहे ( पत्रकारांवर अप्रत्यक्षपणे निशाणा)
हरिभाऊ बागडे - विधिमंडळात रोज रोज असं घडत नाही... कधी-कधीच गैरप्रकार किंवा असंसदीय प्रकार घडतात, एरवी कायदेमंडळात कायदेच बनवले जातात.
प्रश्न - सुधीर भाऊ तुमच्या पत्नी तिरुपती ट्रस्टमध्ये पदाधिकारी झाल्यात... तुम्ही बालाजीकडे काय मागितलं? तुम्हाला राज्याच्या पहिल्या क्रमांकाची खुर्चीचं ध्येय लागलं आहे का?
सुधीर मुनगंटीवार - माझे पहिल्या क्रमांकाच्या खुर्चीचं ध्येय नाही.. माझ्या पक्षात तशी संस्कृती नाही.. मला जनतेच्या मनातली खुर्ची हवी... ( मुख्यमंत्री फडणवीस या उत्तरावर दिलखुलास हसले)
प्रश्न - रावतेजी तुम्ही ज्येष्ठ नेते आहात, तुम्ही बाळासाहेब आणि उद्धव ठाकरे दोघांचे कार्यकाळ पहिले आहेत... उद्धवजींच्या कार्यकाळात काही ज्येष्ठ नेते आमदारांना मंत्रिपद मिळवू देत नाही, असा अनेकांचा आरोप आहे..
दिवाकर रावते - शिवसेनेत फक्त पक्ष प्रमुखच निर्णय घेतात.. शिवसेनेचे सध्या 12 मंत्री आहेत, त्यापैकी फक्त चार विधानपरिषदेचे आहे, बाकी सर्व जनतेतून थेट निवडून आलेले म्हणजेच विधानसभेतून आहेत.. ( यावेळी रावतेंनी भाजपच्या राज्यसभेतील मंत्र्यांचं उदाहरण दिलं.)
प्रश्न - प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांच्यामुळे राज्यात काँग्रेस दुबळी झाली आहे का?
विखे पाटील - हे वस्तुस्थितीला धरून नाही, पण कोणत्याही पक्षात असलेल्या वादाचा परिणाम त्या पक्ष वाढीवर होतोच, वैयक्तिक मतभेद असले तरी काँग्रेसच्या वाढीसाठी आम्ही सर्व मिळून प्रयत्नात आहोत....
प्रश्न - जयंत पाटील तुम्हाला प्रदेशाध्यक्ष पद हे दादा मुळे नव्हे तर ताई मुळे मिळाल्याची चर्चा आहे... म्हणून आता तुम्ही दादागिरीला घाबरत नाही असे म्हणतात... हे खरे आहे का?
जयंत पाटील - खरं पाहिले तर प्रदेशाध्यक्षपद हे दादा किंवा ताई मुळे नव्हे तर शरद पवार साहेबांमुळे मिळाले आहे..
प्रश्न - भाजपच्या वागणुकीमुळे अनेक वेळा शिवसेना ( वाघ ) दुखावला जातो हे खरे नाही का?
सुधीर मुनगंटीवार - आमची दोघांची युती आहे.. एक गाजलेले गाणे आहे " ना ना करते प्यार तुम्ही से कर बैठे" याच गाण्यामुळे बहुतेक त्यांनी आमच्याशी युती केली आहे.. आणि मी वन मंत्री आहे आणि वाघाच्या संरक्षण आणि संवर्धनाची जबाबदारी माझ्यावरच आहे आणि ती जबाबदारी मी योग्यरीत्या बजावत आहे...
प्रश्न - विखे पाटील तुम्ही विरोधी पक्ष नेता आहात मात्र तुमची आणि मुख्यमंत्र्यांची मैत्री असल्याची चर्चा नेहमी असते... म्हणून सभागृहात तुमच्यात लुटुपुटूची लढाई असते का?
विखे पाटील - आमची मैत्री राजकारणापालिकडची आहे, आम्ही राज्याच्या हिताचे पाहतो, सभागृहात नुसते अक्राळ विक्राळपणे बोलूनच विरोधी पक्ष नेता बनू शकतो हे मला मान्य नाही...
प्रश्न - मुनगंटीवारजी अर्थसंकल्प सादर झाल्यावर लाखो कोटींच्या पुरवणी मागण्या सादर करणे योग्य आहे का?
सुधीर मुनगंटीवार - 1 लाख 25 हजार कोटी रुपयांच्या मागण्या सादर केल्या अशा बातम्या वर्तमान पत्रात आल्या, त्यानंतर मी आकडे तपासले, तेव्हा लक्षात आले की यापेक्षा जास्त पुरवणी मागण्या या आधीही झाल्या आहेत.. उलट यावेळेला मीडियाने तथ्य न तपासता एका प्रकारे अतिरेक केला.
प्रश्न - दिवाकर रावतेजी आता अनेक अधिकारी फाईल्सवर इंग्रजीमध्येच नॉटिंगस करतात, शिवसेना सत्तेत राहून त्यासाठी, सरकारी कामकाजात मराठीच्या आग्रहासाठी काही का करत नाही?
दिवाकर रावते - मी माझ्या विभागात फाईल्सवर इंग्रजी नॉटिंगस असल्यास त्यावर स्वाक्षरी करत नाही, सचिवांना मराठीतच नॉटिंग्सचे निर्देश दिले आहेत.. इतर मंत्र्यांनीही तसे करावे अशी माझी अपेक्षा आहे.. मुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्र्यांना सांगावे.
प्रश्न – मुख्यमंत्री साहेब आपण सत्तेत येण्यापूर्वी कुठल्याही भाववाढ झाल्यास खूप आक्रमक आंदोलन करायचे, मात्र आता भरीव भाववाढ होत असतानाही सध्याचे विरोधक आंदोलन करत नाही असे का? काय केले तुम्ही की आंदोलने होत नाही?
मुख्यमंत्री - आम्ही अनेक वर्षे विरोधक राहिलो आणि सध्याचे विरोधक अनेक वर्षे सत्ताधारी राहिले आहेत, म्हणून ते अजूनही सत्ताधारी असल्याच्या तोऱ्यात वागत असतात, तर आम्हाला आजही आम्ही विरोधी पक्षात असल्याचे कधी-कधी वाटते... मात्र आम्ही आता सत्ताधारी होण्याचे शिकतो आहोत.. सध्याच्या विरोधकांना भविष्यातही अनेक वर्षे विरोधी पक्षात राहायचे आहे म्हणून त्यांनी आंदोलने करायला शिकले पाहिजे.
प्रश्न - नाणार, बुलेट ट्रेन अशा अनेक मोठ्या प्रकल्पांना सहकारी पक्षांसह जनतेचाही विरोध आहे. मुख्यमंत्री म्हणून तुमची काय भूमिका राहणार आहे.. दिल्लीतून प्रकल्प मार्गी लावण्याचे दबाव आहे का?
मुख्यमंत्री - बुलेट ट्रेनचे काम सुरू झालेले आहे. इतर ही जे प्रकल्प केले त्याला विरोध झाला, मात्र, नंतर लोकांनी सहमतीने जमिनी दिल्या, प्रकल्प आल्यावर सुरुवातीला अनेक वेळा अनाहूत भीती असते, त्यामुळे भीती काढण्याचे सरकारचे प्रयत्न सुरू आहेत... नाणार संदर्भात शिवसेनेची आणि लोकांची भीती संवादाने दूर करण्याचे प्रयत्न करत आहोत, शिवसेनेसोबत माझे बोलणे सुरु आहे. संवाद महत्त्वाचा आहे, प्रयत्न जरूर करणार.
प्रश्न - भविष्यात जर शिवसेना भाजप युती झाली आणि सरकार आले तर तेव्हा मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचे होणार आणि कोण मुख्यमंत्री व्हावे असे वाटते?
सुधीर मुनगंटीवार - ज्या पक्षाचे जास्त आमदार निवडणून येतील त्यांचे मुख्यमंत्री व्हावे... भाजपचे जास्त आमदार आल्यास देवेंद्र फडणवीस हेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावे...
दिवाकर रावते - युती होणारच नाही... त्यामुळे शिवसेना एकहाती सत्ता आणणार... त्यामुळे हे प्रश्नच गैरलागू आहे...
(या उत्तरावर जयंत पाटील मध्येच हस्तक्षेप करत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना चिमटा काढला आणि मुख्यमंत्री साहेब दिवाकर रावते यांचे उत्तर ऐका असे म्हंटले...
त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी जयंत पाटील यांना राजकारणात असूनही तुमचा अजूनही शिवसेनेच्या नेत्यांच्या विधानावर विश्वास आहे का असा तिरकस प्रतिप्रश्न करत सूचक विधान केलं.)
रॅपिड फायर प्रश्न
सभागृहाचे कामकाज तहकूब केले जाते... तेव्हा त्या दिवसाचे पगार आमदारांना द्यावे का?
सुधीर मुनगंटीवार - पगार दिले पाहिजे
विखे पाटील - पगार दिले पाहिजे...
मुख्यमंत्री - विधीमंडळात आमदार रात्रीपर्यंत काम करतात तेव्हा ओव्हर टाईम नाही मिळत... हे ही लक्षात ठेवले पाहिजे...
प्रश्न -- स्वतंत्र विदर्भ राज्य व्हावे का?
सुधीर मुनगंटीवार - हो झाले पाहिजे...
विखे पाटील -- जनभावना लक्षात घेऊन निर्णय झाले पाहिजे...
जयंत पाटील -- जर जनतेला वाटते की विकास झाला नाही तर जनभावना प्रमाणे निर्णय व्हावा.
दिवाकर रावते - नाही, महाराष्ट्र अखंड राहावा
लोकमत विधीमंडळ पुरस्कार 2018
उत्कृष्ट महिला आमदार ( विधान परिषद ) - विद्या चव्हाण ( राष्ट्रवादी काँग्रेस)
उत्कृष्ट महिला आमदार ( विधानसभा ) - यशोमती ठाकूर ( काँग्रेस )
विधानपरिषद - उत्कृष्ट नवोदित आमदार - अनिल सोले ( भाजप)
विधानसभा - उत्कृष्ट नवोदित आमदार - सुनील प्रभू ( शिवसेना )
विधान परिषद - उत्कृष्ट अभ्यासू वक्ता - संजय दत्त ( काँग्रेस )
विधान सभा - उत्कृष्ट अभ्यासू वक्ता - आशिष शेलार ( भाजप )
विधानसभा जीवन गौरव पुरस्कार - हरिभाऊ बागडे
विधानपरिषद जीवन गौरव पुरस्कार - रामराजे नाईक निंबाळकर
उज्ज्वल निकम यांचे प्रश्न, मुख्यमंत्री, मंत्री आणि विरोधी पक्ष नेत्यांची उत्तरं
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
12 Jul 2018 10:56 PM (IST)
विधीमंडळात होणारे अनेक तासांचे काम एक छोटी बातमी बनते. महाराष्ट्राच्या विधीमंडळात ज्या दर्जाची चर्चा होते, ती देशातील कुठल्याच विधीमंडळात होत नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -