लातूर : पावसाने पाठ फिरवल्यामुळे शेतकरी आधीच जेरीला आला आहे, त्यातच आता 21 कंपनीच्या बोगस बियाण्यांमुळे जे पेरले ते उगवलेच नाही, असा दुहेरी मार शेतकऱ्यांना बसत आहे. कृषी विभागाने या कंपनीच्या ठराविक लॉटच्या बियाण्यांची विक्री थांबवली असली तरी शेतकऱ्यांना आता दुबार पेरणीची वेळ आली आहे. शिवाय आर्थिक फटका बसला तो वेगळाच.

राज्यातल्या अनेक भागात पाऊस कोसळत असताना लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आहे. पेरणीनंतर पावसाने 20 दिवस उघडीप दिल्याने शेतकरी चिंतेत आहेत. मराठवाड्यासह लातूरला मोठ्या पावसाची गरज आहे.

जूनच्या पहिल्या आठवड्यात पेरणी इतका पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहात सोयाबीन आणि मुगाची लागवड केली. मात्र पेरणीनंतर पाऊस कोसळलाच नाही. त्यामुळे पेरलेले खतही गेलं आणि बियाणे उगवलेच नाही. एकरी सहा ते सात हजाराचा फटका पावसाअभावी शेतकऱ्यांना बसला आहे. अधून-मधून रिमझिम बरसली, ढगाळ वातावरणही तयार झालं. मात्र पिकांना जीवदान देणारा पाऊस झालाच नाही.

लातूर जिल्ह्यात पेरणी झालेल्या बहुतांश शेतकऱ्यांना पावसाने दगा दिल्याने फटका तर बसलाच. मात्र बोगस बियाण्यांमुळे आणखी फटका बसला आहे. पेरणीसाठी खरेदी केलेलं अनेक कंपनीचं सोयाबीन उगवलंच नाही. उगवण क्षमता नसलेले बियाणे विक्री करून कंपनी आणि बोगस दुकानदारांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. या बोगस बियाण्याच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन कृषी विभागाने तपासणी केली असता 205 पैकी 21 सोयाबीन बियाण्याचे नमुने नापास झाले आहेत. या नापास झालेल्या लॉटचे बियाणे विक्री करून नयेत, असे आदेश कृषी सेवा केंद्रांना देण्यात आले आहेत.

जिल्ह्यातल्या चाकूर, अहमदपूर, उदगीर, औसा, रेणापूर, निलंगा, देवणी या भागात पावसाअभावी काही उगवलंच नाही. काही ठिकाणी बियाणे उगवले ते करपून गेले. शेतकरी आता पुन्हा दुबार पेरणीच्या तयारीला लागला आहे. त्यामुळे बियाणे न उगवलेल्या शेतीचं सर्वेक्षण करून सरकारने मदत करण्याची मागणी शेतकरी करत आहेत.