नवी दिल्ली : हिंगोली लोकसभेचे (Hingoli Lok Sabha) उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर (Nagesh Bapurao Patil Ashtikar) यांच्या शपथेवर आक्षेप घेण्यात आला. नागेश पाटील आष्टीकर यांनी संसदेत मराठीत शपथ घेतली. मात्र यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचं स्मरण केलं. त्यावर हंगामी लोकसभा अध्यक्षांनी आक्षेप घेत, दुरुस्ती सुचवली. शपथ घेताना जे लिहिलं आहे, त्यानुसारच शपथ घेणं आवश्यक असल्याचं अध्यक्षांनी सांगितलं. त्यामुळे आष्टीकरांना पुन्हा एकदा शपथ घ्यावी लागली.


नागेश पाटील आष्टीकर यांनी शपथेच्या सुरुवातीला म्हटलं की, मी नागेश बापूराव पाटील आष्टीकर लोकसभा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने, दत्त महाराज, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे,व माझे वडील  बापूराव पाटील आष्टीकर यांना स्मरुन शपथ घेतो की, मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रती श्रद्धा व निष्ठा बाळगीन. आणि भारतीय एकात्मतेचे स्मरण करेन, जे कर्तव्य मला प्राप्त होते, ते नेकीने पार पाडेन.


आष्टीकर शपथ घेत असताना, अध्यक्षांनी त्यांना थांबवलं


आष्टीकर यांनी अशी शपथ घेत असताना, अध्यक्षांनी त्यांना थांबवलं आणि जे लिहिलं आहे तेच वाचायला सांगितलं. असं चालणार नाही, जे मराठीत लिहिलं आहे तेच वाचावं लागेल, तशीच शपथ घ्यावी लागेल, असं सांगितलं. त्यानंतर मग नागेश पाटील आष्टीकर  यांनी पुन्हा एकदा शपथ घेतली. यावेळी त्यांनी अन्य नावांचा उल्लेख टाळत जशी लिहिली आहे तशीच शपथ घेतली. हिंगोली लोकसभा मतदारसंघातील लढत ही अत्यंत तुल्यबळ मानली जात होती. या मतदारसंघात ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट असा सामना सुरु होता. यामध्ये  ठाकरे गटाच्या नागेश पाटील आष्टीकर यांनी शिंदे गटाच्या बाबूराव कदम यांचा पराभव केला.


'या' नवीन खासदारांनी घेतली शपथ


चंद्रपूर लोकसभेच्या खसादर प्रतिभा धानोरकर, छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे, यवतमाळचे खासदार संजय देशमुख यांनी देखील शपथ घेतली. तसेच परभणीचे खासदार संजय जाधव, नांदेडचे खासदार वसंत चव्हाण, जालन्याचे खसदार कल्याण काळे,, भास्कर भगरे, राजाभाऊ वाजे, हेमंत सावरा, निलेश लंके, सुरेश म्हात्रे, सुनिल तटकरे, श्रीरंग बारणे या नवीन खासदारांनी देखील आज शपथ घेतली. लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. आज लोकसभेत निवडूण आलेल्या सर्व सदस्यांचा शपथविधी पार पाडला. यावेळी महाराष्ट्रातील खासदारांनी शपथ घेतली.  


महत्वाच्या बातम्या:


Parliament Session 2024 : संसदेत शपथ घेताच मोदी आणि राहुल गांधी पहिल्याच दिवशी आमनसामने; दोघांच्या भेटीत काय घडलं?