Latur NEET Exam Paper Leak: लातूर : देशभरात गदारोळ माजवणाऱ्या नीट पेपरफुटीचं (NEET Paper Leak Case) लातूर कनेक्शन (Latur News) आता थेट माढापर्यंत (Madha) पोहोचलं आहे. या प्रकरणात दोन्ही शिक्षकांना दहशतवाद‌विरोधी पथकाच्या पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. त्यापैकी संजय जाधव (Sanjay Jadhav) हा सोलापुरातील (Solapur News) माढ्याच्या प्राथमिक शाळेत गेल्या वर्षभरापासून उपशिक्षकाचं काम करत होता. जिल्ह्यातील शाळेत असणाऱ्या उपशिक्षकाचं नाव नीट परीक्षा कनेक्शनमध्ये आल्यानं माढा तालुक्याच्याच नव्हे तर जिल्ह्याच्या शिक्षण विभागातही खळबळ माजली आहे. 


नीट (NEET) प्रकरणातील आरोपी शिक्षकानं पोलिसांच्या चौकशीनंतर पोबारा केला होता. आता अखेर पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्षण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, अटकेत असलेल्या संजय जाधवबाबत शिक्षण विभागात अधिकृतरीत्या कोणताही अहवाल पोलिसांकडून देण्यात आलेला नाही. 


लातूर येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील उपशिक्षक संजय तुकाराम जाधव आणि त्याचा मित्र उपशिक्षक जलीलखा उमरखान पठाण हे दोघेजण पैसे घेऊन नीट परीक्षा उत्तीर्ण करण्याचे रॅकेट चालवत असल्याची माहिती एटीएस पथकाला समजल्यानंतर शनिवारी ते लातूरमध्ये दाखल झाले आणि संबंधित दोघांची पडताळणी आणि चौकशी केली आणि त्यांच्यासह इतरांवर रविवारी रात्री उशिरानं गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर सोमवारी दोघांनाही अटक करण्यात आली. 


संजय जाधव माढ्यातील प्राथमिक शाळेत उपशिक्षक


संशयित आरोपी उपशिक्षक संजय जाधव 26 जून 2023 पासून माढा तालुक्यातील टाकळी प्राथमिक शाळेत उपशिक्षक म्हणून कार्यरत आहे. त्याअगोदर तो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील मांगेली देऊळ जिल्हा परिषद शाळेत शिक्षण सेवक म्हणून 10 सप्टेंबर 2003 रोजी शाळेत हजर होऊन नियुक्त झाला होता. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातच सावंतवाडी पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद शाळा मडुरे नंबर 3 शाळेत उपशिक्षक म्हणून कार्यरत होता आणि तेथून तो 2 मे 2023 रोजी कार्यमुक्त होऊन टाकळी येथे रुजू झाला होता. तो आजपर्यंत येथीलच शाळेवर कार्यरत आहे. 


"माझी पत्नी मनोरुग्ण...", असं सांगून संजय जाधवनं अक्कलकोटला बदली करुन घेतली


नुकत्याच झालेल्या शिक्षकांच्या बदलीमध्ये त्यानं आपली पत्नी मनोरुग्ण असल्याचं दाखवून अक्कलकोट तालुक्यात बदली करून घेतल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. मात्र, अद्याप संजय जाधवला टाकळी येथून कार्यमुक्त करण्यात आलेलं नाही. पण 15 जूनला शाळा सुरू झाल्यापासून तो जिल्हा परिषदेच्या शाळेत फिरकला नसल्याचं त्याच्या गैरहजेरीवरुन स्पष्ट झालं आहे. 


शाळेवर पोटशिक्षक म्हणून नियुक्ती पण तो घ्यायचा लातूरमध्ये क्लासेस


नीट परीक्षा घोटाळ्यातील संशयित शिक्षक संजय जाधवानं दहा हजार रुपये देऊन पोटशिक्षकाची नेमणूक केली होती. आणि स्वतः लातूरमध्ये क्लास घेत असल्याची धक्कादायक बाबही समोर आली आहे. तसेच, एवढंच नव्हे तर अक्कलकोट तालुक्यात बदलीसाठी पत्नीलाही जाधव यांनी मनोरुग्ण दाखवलं असल्याचंही निवेदनात म्हटलं आहे. याबाबत त्या शिक्षकाची चौकशीच्या मागणीचं निवेदनही जगताप यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्याकडे केली आहे.


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI