Loksabha Election 2024 चंद्रपूर : आपल्या राज्याच्या शेजारी असलेल्या तेलंगणा- महाराष्ट्र सीमेवरील 14 वादग्रस्त गावात आज मतदान (Lok Sabha Election 2024) होतंय. या 14 गावांमध्ये 5 हजार 117 मतदार आहेत. हे गाव दोन राज्याच्या सीमेवर असल्याने येथील नागरिकांकडे दोन्ही राज्याचे मतदानाचे ओळखपत्र आहे. मागील कित्येक वर्षांपासून ते या दोन्ही राज्यात आपला मतदानाचा हक्क बजावत आले आहेत. शिवाय ते या दोन्ही राज्याच्या सर्व सरकारी सेवासुविधा देखील घेत असतात. मात्र, यंदा दोन्ही राज्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मिळून हे दुहेरी मतदान टाळण्यासाठी विशेष उपाय काढत महत्वपूर्ण निर्णय घेतला होता. मात्र, आज या निर्णयाचा पूर्णत: फज्जा उडाल्याचे बघायला मिळाले आहे. 


दुहेरी मतदान टाळण्यासाठीच्या सर्व उपाययोजनांचा फज्जा


महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या सीमेवर असलेल्या जिवती तालुक्यातील 14 गावांतील नागरिकांकडे दोन राज्यांची मतदार कार्ड आहेत. इथले ग्रामस्थ दोन्ही राज्यातील सरकारी योजनांचा लाभ घेतात आणि निवडणुकीत दोन्ही राज्यांमध्ये ते मतदान करतात. विशेष म्हणजे चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने तेलंगणा-महाराष्ट्र सीमेवरील या वादग्रस्त गावातील दुहेरी मतदान थांबविण्यासाठी पहिल्या टप्प्यात झालेल्या मतदानाच्या वेळी महत्वपूर्ण निर्णय घेतला होता. त्यासाठी चंद्रपूर आणि आसिफाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष बैठकही घेतली होती.


यात दुहेरी मतदान टाळण्यासाठी मतदारांच्या तर्जनीच्या संपूर्ण नखाला शाई लावण्याचा निर्णय घेतला होता. या शाहीच्या आधारे मतदारांची ओळक पटणार होती आणि त्यावरुन हे दुहेरी मतदान टाळलं जाऊ शकतं, असा तर्क दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांकडून लावण्यात आला होता. ठरल्याप्रमाणे दोन्ही राज्याच्या प्रशासकीय यंत्रणेने या नियमांची पूर्तता अमलबजावणी करणे अपेक्षित होतं. मात्र आज तेलंगणात होऊ घातलेल्या चौथ्या टप्प्याच्या निवडणुकांमध्ये या निर्णयाचा पूर्ण फज्ज उडाल्याचे बघायला मिळत आहे.  


14 गावांमध्ये 5 हजार 117 मतदार


चंद्रपूर आणि आसिफाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी एक आंतरराज्यीय बैठक घेत हा महत्वपूर्ण निर्णय घेतला होता. त्यामुळे दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या या निर्णयाप्रमाणे दुहेरी मतदान टाळलं जाणार असं वाटत असतांना तेलंगणाच्या अधिकाऱ्यांनी नियमांची पायमल्ली केल्याचे समोर आले आहे. या 14 गावांमध्ये 5 हजार 117 मतदारांनी 19 एप्रिलला चंद्रपूर लोकसभेसाठी मतदान केलं होतं आणि आज तेलंगणाच्या आदीलाबाद लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होत असताना येथे देखील हे मतदार मतदान करताना दिसून येत आहेत.  


महाराष्ट्राच्या तुलनेत तेलंगनाकडून जास्त विकासकामं


महाराष्ट्र सरकारच्या तुलनेत तेलंगणा सरकारने या गावात अधिक विकासात्मक कामे केली आहेत. त्यामुळे या गावातील नागरिकांचा कल तेलंगणा राज्याकडे अधिक आहे. या गावांची प्रमुख मागणी वन जमिनीचे पट्टे मिळण्याबाबत असून जमिनीचे पट्टे देण्यास महाराष्ट्र सरकार अपयशी ठरले आहे. तर दुसरीकडे तेलंगणा सरकारने जमिनीचे पट्टे वाटप केले आहेत. 


मुकादमगुडा, परमडोली, महाराजगुडा, शंकरलोधी यासारखी 14 गावं तेलंगाणा राज्यात मतदान करणार आहेत. तर दुसरीकडे या सर्व अनागोंदी कारभाराला महाराष्ट्र सरकारच दोषी असल्याचा आरोप या भागातल्या महाराष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी केला.


इतर महत्वाच्या बातम्या