पुणे : पुण्यात लोकसभेच्या निवडणुकीसाठी मतदान (Pune LOksabha Election) सुरु आहे. मात्र पुण्यातील भाजप आणि कॉंग्रेस कार्यकर्त्यांचे आरोप प्रत्यारोप काही थांबायचं नाव घेत नाही आहे. भाजप पैसे वाटप करत आहेत, असं म्हणत काल रवींद्र धंगेकरांनी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केलं. त्यानंतर आता मतदानाच्या दिवशी भाजपकडून आंदोलन करण्यात येत आहे. पुण्यातील कसबा पेठेतील फडके हौद चौकात भाजपचे कार्यकर्ते हेमंत रासनेंच्या नेतृत्वात ठिय्या आंदोलन करत आहेत.
फडके हौद चौकात कॉंग्रेसकडून लावण्यात आलेले बॅनर अनधिकृत असून पोलीस त्यावर कारवाई करत नसल्याचा आरोप करत भाजपकडून हे ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे आणि हे बॅनर कॉंग्रेसकडून लावण्यात आल्याचा दावा केला जात आहे. मतदान केंद्राच्या परिसरात अशा प्रकारचं बॅनर लावून मतदारांची दिशाभूल केली जात आहे, असा आरोप भाजपकडून केला जात आहे.
11 मेला प्रचार संपला त्यानंतर कोणत्याही पद्धतीचा प्रचार करता येत नाही. मात्र मतदानाच्या दिवशी शंभर मीटर दूरपर्यंत साधारण काहीही लावता येत नाही. मात्र कॉंग्रेसने त्यांच्या उमेदवाराचा फोटो आणि पक्षाचं चिन्ह असलेलं बॅनर बुथवर लावलं आहे. अशा प्रकारचं बॅनर लावायला बंदी आहे. हे आचारसंहितेंचं उल्लंघन आहे. सगळ्या गोष्टी बेकायदेशीर करण्याची धंगेकरांची परंपरा आहे. त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे नेते हेमंत रासने यांनी केली आहे. त्यासोबतच रासनेंची उमेदवारी रद्द करण्यात यावी, अशीही मागणी त्यांनी केली.
रवींद्र धंगेकरांनीदेखील काल आंदोलन भाजप पैसे वाटत असल्याचा आरोप करत ठिय्या आंदोलन केलं. त्यावर बोलताना रासने म्हणाले की, धंगेकरांनी स्वत:च ते पैशाचे पाकिटं बनवले आणि आंदोलन केलं. हा माणूस खोटारडा आहे. मागील अनेक वर्ष धंगेकर अशाच प्रकारचं काम करताना दिसत आहे. हा संपूर्ण आखो देखाल हाल आहे. मागे बॅनर लावलं आहे आणि त्यासमोरच आम्ही उपोषणाला बसलो आहे, त्यामुळे धंगेकरांवर कारवाई करा, असंही रासने म्हणाले आहेत.
इतर महत्वाची बातमी-
कुठे आंबे तर कुठे निम्या किंमतीत आईस्क्रिम; मतदार पुणेकरांसाठी आज भन्नाट ऑफर