Lok Sabha Election 2024 Phase 2 अमरावती : देशाला स्वातंत्र्य मिळून आज 77 वर्षाचा काळ लोटला आहे. मात्र आम्हाला अद्याप कोणत्याही मूलभूत सुविधा मिळाल्या नसल्याचा आरोप करत अमरावती (Amravati) जिल्ह्यातील मेळघाटमधील सहा गावकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत टोकाचे पाऊल उचलले आहे. राज्यातील आठ मतदारसंघात आज मतदानाच्या रणसंग्राम होत असताना अमरावती लोकसभा मतदारसंघातील (Amravati Lok Sabha Election 2024) या सहा गावातील गावकऱ्यांनी थेट मतदानावर बहिष्कार टाकला आहे. यामध्ये रंगबेली, कुंड, धोकडा, खामदा-किन्हीखेडा, आणि खोपमार या गावांचा समावेश आहे. आजवर निवडून दिलेल्या एकाही लोकप्रतिनिधिने आमच्या गावांना मूलभूत सेवासुविधा पुरवल्या नाहीत. परिणामी आम्ही नाईलाजास्तव हे टोकाचे पाऊल उचलल्याची भावना या गावातील गावकऱ्यांनी बोलताना व्यक्त केली आहे.
सहा गावांचा थेट मतदानावर टाकला बहिष्कार
अठराव्या लोकसभा निवडणुकीतील (Lok Sabha Election 2024) दुसऱ्या टप्प्याच्या मतदानाला आज सुरुवात झाली आहे. देशभरातील 13 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील एकूण 88 जागांसाठी सुमारे 15.88 कोटी मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तर महाराष्ट्रातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, नांदेड, हिंगोली आणि परभणी या आठ मतदारसंघात मतदानाचा रणसंग्राम रंगणार आहे. एकीकडे या निवडणुकांची रणधुमाळी रंगत असताना दुसरीकडे मात्र अमरावतीच्या मेळघाट या आदिवासी बहुल भागातील सहा गावातील गावकऱ्यांना मतदानावर बहिष्कार टाकण्याची वेळ आली आहे.
गेल्या 77 वर्षांपासून आम्ही मुलभुत सुविधांपासून वंचित असून आम्ही निवडून दिलेले एक ही प्रतिनिधि आमच्या समस्यांच्या निराकरण करण्यास तत्पर दिसत नाही. पिण्याचे पाणी, विद्युत सेवा, पक्के रस्ते, आरोग्य केंद्र, इत्यादिसारख्या एकही मूलभूत सुविधा आम्हाला मिळाल्या नसून प्रत्येक लोकप्रतिनिधीकडे आम्ही मागणी केली असता आमच्या समस्यांवर तोडगा निघाला नाही. जोपर्यंत आमच्या समस्यां निकाली निघत नाही तोपर्यंत आम्ही मतदान करणार नसल्याची संतप्त भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे आज होणाऱ्या मतदानावर गावकऱ्यांनी बहिष्कार टाकला असून एकही व्यक्ति मतदान केंद्रावर जाणार नसल्याचा निर्धार या गावकऱ्यांनी केला आहे.
आधी मतदान, मगचं लग्न! 2 नवरदेवांनी बजावला मतदानाचा हक्क
विवाहसोहळा म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील आनंदाचा, अविस्मरणीय आणि अतिशय महत्वाचा प्रसंग. पण त्याहून महत्वाचं असतं ते आपल्या राष्ट्राप्रती, आपल्या देशाप्रती असलेलं कर्तव्य. हेच लक्षात ठेवत अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील एकलारा येथील निलेश उर्फ विक्की महादेव मारबदे आणि खरबी मांडवगड येथील मतदार सुधीर अब्दुल औधकर, या दोन नवरदेवांनी बोहल्यावर चढण्यापूर्वी त्याचं मतदानाचं कर्तव्य बजावलं. लग्न मंडपात जाण्यापूर्वी, लग्नाच्या वरातीसाठी घोड्यावर बसण्यापूर्वी दोन्ही नवरदेवांनी चांदूर रेल्वे तालुक्यातील खरबी मांडवगड येथील मतदान केंद्र क्र. 357 वर गेले आणि आधी त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. आधी मतदान मगच लगीन. अशा त्यांच्या बाण्याचं सर्वत्र कौतुक होत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या