BLOG : राज्याच्या राजरकारणात जसं वातावरण बदलत जातं, अगदी तसंच काहीसं आमच्या बाबतीत झालं. ते कसं? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. तर 'मतदारसंघाच्या शोधात जय-विरु' हा कार्यक्रम गेले काही दिवस सुरु आहे. मात्र हाच कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी आमची जी काय त्रेधा तिरपीट उडाली होती, ते आमचं आम्हालाच माहित. पण आमच्यावर जेव्हा राजीव खांडेकर सर आणि सरिता कौशिक मॅम यांनी ही जबाबदारी टाकली तेव्हा आमचा आनंद गगनात मावेनासा होता. बऱ्याच गोष्टी होत्या, अनेक गोष्टींची बांधणी करायची होती, 25 दिवस संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढायचा होता, सोपं नव्हतं. पण मिळालेली संधी सोडायची नाही, हा निश्चय केला होता. त्यानंतर सुरुवात झाली ती जय-विरुच्या प्रवासाची.
एखाद्या उमेदवाराला तिकीट मिळेपर्यंत जेवढं टेन्शन असतं, अगदी तसंच आमच्या बाबतीत म्हणजे मी आणि माझा सहकारी संकेत वरक याच्यासोबत झालं. कारण हा कार्यक्रम सुरू होण्यापासून ते त्याच्या शेवटापर्यंत हे शिवधनुष्य पेलण्याचं सर्वात मोठं आव्हान आमच्या समोर होतं. कार्यक्रमाची जबाबदारी जेव्हा आमच्यावर, म्हणजेच मी आणि माझा सहकारी संकेत वरक याच्यावर आली, तेव्हा आम्ही ठरवलं की काहीही होऊ दे, वरिष्ठांनी आपल्यावर टाकलेला विश्वास खाली पडू द्यायचा नाही. झालं... आणि सुरुवात झाली ती म्हणजे कार्यक्रमाच्या बांधणीला.
जय-विरुची बुलेट विथ साईडकार
आता आमच्या या कार्यक्रमाचं प्रमुख आकर्षण होतं ते म्हणजे जय-विरुची बुलेट विथ साईडकार. शोले चित्रपटात अमिताभ बच्चन (जय) आणि धर्मेंद्रची (विरु) जशी साईड कार बाईक आहे, तशीच आम्हाला या कार्यक्रमासाठी हवी होती. आताच्या या जमान्यात साधी बुलेट बाईक तर मिळून जाईल हो, पण तिच्या साईड कारचं काय? आणि त्यामुळेच आमच्यासाठी ही साईडकार शोधणं हे सर्वात मोठं आव्हान होतं. बरीच शोरुम्स पालथी घातली, गॅरेजमध्ये चौकशा केल्या, काही रायडर्सकडून अशी गाडी कुठे मिळेल का याची विचारणाही केली. मात्र आमच्या पदरी पावलोपावली निराशाच पडली.
...आणि अखेर साईडकार बाईक मिळाली
जशी थ्री इडियट्समध्ये जेव्हा रँचो क्लासमध्ये फर्स्ट येतो तेव्हा राजू आणि फरहानची अवस्था झाली होती, तशीच काहीशी माझी आणि संकेतची झाली. त्यानंतर आम्ही गाडीचा विषय देवावर सोडून दिला आणि अखेर देवच आमच्या मदतीला धावून आला. आम्हाला अशाच पद्धतीच्या बाईक बनवणाऱ्या वर्कशॉपचा नंबर मिळाला आणि आम्ही शोधमोहिमेवर निघालो. जेव्हा ती बाईक आम्ही बघितली, तेव्हा आमच्या जिवात जीव आला आणि आम्ही त्या बाईकची टेस्ट ड्राईव्ह घेण्याचं ठरवलं.
पण आता चालवायची कशी?
सुरुवातीला मी कॉन्फिडन्समध्ये बाईक चालवायला घेतली, तेव्हा ती बाईक रस्त्यावर कमी आणि रस्त्याच्या खालीच जास्त जात होती. म्हटलं आत्ताच ही अवस्था आहे, पुढे काय होईल याच्या विचारानेच मला घाम फुटला. आपली अशी अवस्था आहे म्हटल्यावर किमान संकेतला तरी बाईक जमेल अशी भाबडी आशा माझी होती. मात्र माझ्या आशेची संकेतनं माती केली, त्यालाही ती साईड कार बाईक जमली नाही. त्यानंतर आम्ही थेट ऑफिस गाठलं. जेवढा आनंद आम्हाला बाईक मिळाली याचा झाला होता, तेवढंच दु:ख आम्हाला बाईक येत नसल्याचंही झालं होतं. पण आम्ही आमच्या चेहऱ्यावर ते जरासं सुद्धा दाखवलं नाही. पण त्याचं टेन्शन मात्र होतं.
अखेर पुण्यातून कार्यक्रमाचा नारळ फुटला
आता बाईक मिळाल्यावर आमच्या प्रवासाचा दुसरा टप्पा सुरु झाला. निघताना मी, संकेत, कॅमेरामन अजित कदम आणि अनिल सनगरे मोहिमेसाठी निघालो. पुण्याला निघताना आम्हाला दिलासा देणारी गोष्ट होती ती म्हणजे विनोद घाटगे या माणसाची मिळणारी साथ. कारण ते फक्त पहिल्या दिवसासाठी आमच्यासोबत येणार होते. सुरुवात अर्थात विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यापासून झाली. पुण्यात सुरुवातीलाच आमचे गेस्ट होते वसंत मोरे. त्यांना मुंबई सोडताना फोन लावला आणि तेव्हाच सगळी कनसेप्ट समजावली. पण वसंत मोरेंच्या टाईमिंगप्रमाणे जुळवाजुळव करणं जरा कठीण गेलं. पण आम्ही ते जमवलंच. वसंत मोरेंनी आम्हाला वेळ दिली ती म्हणजे सकाळी 11 वाजता. आम्ही वेळेच्या अर्धा तास आधीच शनिवार वाड्याजवळ येऊन थांबलो. वसंत मोरे त्यांची गाडी घेऊन शनिवार वाड्याजवळ आले. आल्यावर ते भेटले त्यांना जरा आम्ही ब्रीफ केलं. जरा ड्रॅमॅटीक कसं वाटेल हे त्यांना जरा पटवून दिलं आणि तात्या शूट करायला तयार झाले.
तसं वसंत मोरे हा माणूस प्रचंड जॉली आहे. जसं त्यांचं काम उत्तम आहे, तसाच त्यांचा स्वभावही. वसंत मोरेंचा चाहता वर्ग तसा मोठा. त्यामुळे आम्ही शूट करत असताना त्याची प्रचिती क्षणाक्षणाला येत होती. पुण्यातील शनिवारवाड्यापासून आम्ही शूटला सुरुवात केली आणि शेवट लक्ष्मीरोडवर केला. भर उन्हात वसंत मोरेंनी आम्हाला न वैतागता आम्हाला सहकार्यही केलं. पण वसंत तात्यांना शो ची संकल्पना तुफान आवडली. त्यांनी यावेळी त्यांच्या काळातले किस्सेही सांगितले. आणि पहिला टप्पा पार पाडण्यात आम्ही यशस्वी झालो. वसंत मोरेंचा इंटरव्यूव्ह संपला बरोबर 1 वाजता. सहसा दुपारी एक वाजताची वेळ ही सर्वसामान्य पुणेकरांची तशी झोपेची. त्यामुळे आम्ही पुणेकरांच्या प्रतिक्रिया दुपारी चारनंतर घ्यायचं ठरवलं आणि तोपर्यंत पोट पूजा करण्यासाठी आम्ही गाठलं हॉटेल संदीप...
जेवण झाल्यावर आम्ही गाठली महात्मा फुले मंडई. मंडईमध्ये पुणेकरांच्या प्रतिक्रिया घ्यायला गेलो. प्रतिक्रिया घ्यायला गेल्यावर सरळ उत्तरं देतील ते पुणेकर कसले. अगदी तोलून-मापून उत्तरं दिली. पण पुणेकरांनी आम्हाला नेमकी काय उत्तरं दिली, त्यांचं म्हणणं तरी नेमकं काय आहे, हे तुम्हीच पाहा.