Lok Sabha Election : देशभरात लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election) आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात आयएएस (IAS) अधिकाऱ्याची नियुक्ती त्याच्या स्वतःच्याच जिल्ह्यात केल्याने हा प्रकारे म्हणजे नियमांचा भंग असून या नियुक्तीमुळे आगामी लोकसभेच्या निवडणुकीत मतदारांवर याचा प्रभाव पडू शकतो. असे असतांना बुलढाणा (Buldhana) जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर असलेले आयएएस अधिकारी विशाल नरवाडे यांची सरकार ने त्याच्या स्वतःच्याच जिल्ह्यात नियुक्ती केली होती. त्यामुळे या विरोधात आझाद हिंद शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ऍड. सतीश रोठे यांनी आयएएस अधिकारी विशाल नरवाडे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती.
मात्र, ही तक्रार केल्यामुळे नरवाडे यांच्या समर्थक आणि नातेवाईकांनी ऍड. सतीश रोठे यांच्या कार्यालयासमोर जाऊन त्यांना अश्लील शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप रोठे यांनी केला आहे. या प्रकरणामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून या प्रकरणी ऍड. सतीश रोठे यांनी बुलढाणा पोलिसात तक्रार दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत यातील चार संशयित इसमांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
सक्त नियम असूनही स्वतःच्याच जिल्ह्यात नियुक्ती
बुलढाणा जिल्ह्यातील धाड या गावचे रहिवासी असलेले आयएएस अधिकारी विशाल नरवाडे हे 2020 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. मात्र एन निवडणुकीच्या काळात आयएएस विशाल नरवाडे यांची बदली बुलढाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर करण्यात आली. खरंतर निवडणूक आयोगाच्या नियमानुसार कुठल्याही अधिकाऱ्याला किंवा कर्मचाऱ्याला त्याच्या स्वतःच्या जिल्ह्यात निवडणूक काळात नियुक्ती देण्यात येत नसते. असा सक्त नियम असूनही विशाल नरवाडे यांची नियुक्ती निवडणुकीच्या तोंडावरच देण्यात आल्याने नव्या वादाला तोंड फुटल होते. परिणामी विशाल नरवाडे यांची तत्काळ बदली करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रीय आजाद हिंद संघटनेचे अध्यक्ष ऍड. सतीश रोठे यांनी या केली होती. तसेच या संबंधी मुख्य निवडणूक आयुक्तांना लेखी तक्रार देखील केली होती.
चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
त्यानंतर या तक्रारीची दखल घेत दोनच दिवसात विशाल नरवाडे यांची धुळे येथे बदली करण्यात आली. विशाल नरवाडे हे मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील असल्याने त्यांच्या समर्थकांनी आणि इतर नातेवाईकांनी ऍड सतीश रोठे यांचा विरोध करत त्यांच्या कार्यालयासमोर जाऊन त्यांना अश्लील शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप ऍड. सतीश रोठे यांनी केला असून या प्रकरणी बुलढाणा पोलिसात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सध्या पोलीस करत आहे. मात्र या प्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या