Nagpur News नागपूर : कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी (Liquor Scam Case) ईडीकडून (ED) दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आम आदमी पार्टीचे (आप) नेते अरविंद केजरीवाल (Delhi CM Arvind Kejriwal Arrest) यांना गुरुवारी रात्री ईडीनं(ED) अटक केलीय. केजरीवाल यांच्या अटकेनंतर सर्वत्र आपचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. या कार्यकर्त्यांकडून देशभरात ठिकठिकाणी आंदोलन केले जात आहे. अशातच या अटकेच्या कारवाईचे पडसाद आता नागपूरात (Nagpur News) देखील उमटतांना दिसत दिसत आहे.


नागपूरातील गणेश पेठ परिसरामध्ये असलेल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या मुख्य प्रचार कार्यालयासमोर जाऊन आपचा कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलन पुकारले आहे. यावेळी हातात हितलरचा फोटो घेऊन केंद्र सरकार, भाजप आणि पंतप्रधान मोदींच्या विरोधात घोषणाबाजी करत या कारवाईचा निषेध आपच्या कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. 


 नागपूरात आपचे कार्यकर्ते आक्रमक


आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते आज सकाळपासूनच आक्रमक असल्याचे बघायला मिळत आहे. सुरुवातीला आपकडून जाहीर करण्यात आले होते कि, आम्ही भाजप कार्यालयाजवळ आंदोलन करू. मात्र त्यानंतर मोठ्या संख्येने जमलेल्या कार्यकर्त्यांनी तिथवर न थांबता त्यांनी थेट नितीन गडकरी यांच्या निवडणूक प्रचार मुख्य कार्यालयाजवळ जाऊन आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना या कार्यालयाच्या शंभर मीटर अंतरावरच अडवून धरले असता, या आंदोलनकर्त्यांनी संताप व्यक्त करत घोषणाबाजी सुरू केली. आपच्या कार्यकर्त्यांकडून होत असलेल्या तीव्र नारेबाजी आणि संताप बघता पोलिसांनी या कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या प्रयत्नांना फार यश न आल्याने पोलिसांनी त्यातील काही कार्यकर्त्यांना अटक करत आंदोलन शांत करण्याचा प्रयत्न केला. 


भाजपच्या मुख्यालयाबाहेर आंदोलनाचे तीव्र पडसाद


या आंदोलन वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्र सरकार आणि भाजपचा विरोधात घोषणाबाजी करत या कारवाईचा निषेध नोंदविला आहे. दिल्लीमध्ये अचानक झालेली कारवाई ही म्हणजे तानाशाही असून सत्तेचा गैरवापर होत असल्याचा आरोप आपच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. या कार्यकर्त्यांनी यावेळी हातात हिटलरचा फोटो घेऊन या कारवाईचा निषेध व्यक्त केला आहे. सध्या घडीला या आंदोलनकर्त्यांना नितीन गडकरी यांच्या कार्यालयापासून 100 ते 200 मीटर अंतरावर रोखून धरले आहे. मात्र मोठ्या संख्येने आपच्या कार्यकर्ते जमल्याने पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त देखील या स्थळी तैनात करण्यात आला आहे. 


महाराष्ट्राभरात आपचे कार्यकर्ते आक्रमक


दरम्यान, अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवर आम आदमी पार्टीकडून देशभरात निषेध व्यक्त केला जात आहे. या अटकेचे महाराष्ट्रातही पडसाद उमटत आहेत. नाशिकमध्ये मेहेर सिग्नल परिसरात रास्ता रोको करण्यात आला. यावेळी टायर जाळत निषेध व्यक्त करण्यात आला. कोल्हापूरमध्येही आपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. आपचे कार्यकर्ते थेट भाजपच्या कार्यालयाकडे कुच करत होते. मात्र यावेळी पोलिसांनी या कार्यकर्त्यांची धरपकड केली. कोल्हापुरातील महावीर कॉलेज चौकातून आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते हे बीजेपी कार्यालयावर आंदोलनासाठी निघाले होते. त्यांना कोल्हापूर पोलिसांनी बळाचा वापर करत रोखले आहे. यावेळी पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यात शाब्दिक चकमक झाली. पोलिसांनी आंदोलकांना रोखत अक्षरशः जबरदस्तीने उचलून गाडीत टाकले. यावेळी मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी आपच्या कार्यकर्त्यांनी केली. 


इतर महत्वाच्या बातम्या