नांदेड : राज्यात लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर शनिवारपासून आचारसंहिता (Code of Conduct) लागू झाली आहे. दरम्यान, राज्यातील आचारसंहिता भंगाचा पहिला गुन्हा नांदेड (Nanded) जिल्ह्यात दाखल झाला आहे. नांदेड जिल्ह्यातील मुखेड विधानसभा मतदारसंघात (Mukhed Assembly Constituency)  निवडणूक कर्तव्यात कसूर केल्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लेंडी प्रकल्पाचे उपविभागीय अभियंता एल.जे. जाधव यांच्यावर हा गुन्हा दाखल झाला आहे. नांदेड़चे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने नांदेडच्या मुखेड पोलिसांत हा गुन्हा दाखल केला गेला आहे.


जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी लोकसभा निवडणुकीत मुखेड विधानसभा मतदारसंघात झोन क्रमांक 25 निवळीकरिता क्षेत्रीय अधिकारी म्हणून एल. जे. जाधव यांची नियुक्ती केलेली आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली लोकसभा निवडणुकीच्या संबंधाने 2 फेब्रुवारी रोजी नियोजन भवन येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेला एल. जे. जाधव यांनी दांडी मारली. त्यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर क्षेत्रीय अधिकारी जाधव यांना अनेकवेळा दूरध्वनीद्वारे निवडणूक संबंधीचे कामकाज करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. तसेच निवळी येथील मतदान केंद्र तपासणी अहवालही त्यांनी सादर केला नाही. त्यामळे हा अहवाल वरिष्ठांना देता आला नाही. 


अंतिम नोटीस देऊन सुद्धा खुलासा नाही...


दरम्यान, जाधव यांना अंतिम नोटीस देऊन सुद्धा त्यांनी अद्यापपर्यंत नोटिसीचा खुलासा केला नाही. त्यामुळे निवडणूक संबंधाने दिलेले कर्तव्य न करता निवडणूक प्रक्रियेत हलगर्जीपणा आणि निष्काळजीपणा केल्याने या प्रकरणात नायब तहसीलदार अशोक लबडे यांच्या तक्रारीवरून उपविभागीय अभियंता एल. जे. जाधव यांच्या विरोधात मुखेड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.


राज्यातील पहिला गुन्हा...


निवडणूक आयोगाने शनिवारी पत्रकार परिषद घेऊन देशभरातील लोकसभा निवडणुकींच्या तारखा जाहीर केल्या. महाराष्ट्रात देखील एकूण पाच टप्प्यात लोकसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे कालपासूनच राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. अशात निवडणूक आयोगाने आचारसंहिता भंग करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. दरम्यान, राज्यातील आचारसंहिता भंगाचा पहिला गुन्हा नांदेड जिल्ह्यात दाखल झाला आहे. विशेष म्हणजे तो देखील एका अधिकाऱ्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


Marathwada Lok Sabha Election : आचारसंहिता जाहीर! मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात मतदान कधी, निकाल कधी?