मुंबई : राज्यात एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. लॉकडाऊनमुळे लोकं चिंतेत असताना राज्य सरकारमध्ये मात्र वेगळीच खलबतं चालली असल्याचे चित्र आहे. शिवसेना खासदार आणि महाविकास आघाडीतील महत्वाचे दुवा असलेले संजय राऊत यांनी केलेल्या एका ट्विटमुळं या चर्चेला पुष्टी देखील मिळाली आहे. सरकार मजबूत आहे. चिंता नसावी, स्थिरतेबाबतच्या अफवा निव्वळ पोटदुखी असल्याचे संजय राऊत यांनी म्हटलं आहे. कोरोनावर लस आणि ठाकरे सरकार पाडण्याचा डोस विरोधकांना सापडायचा आहे, असं देखील संजय राऊत यांनी म्हटलं आहे. कोरोनाच्या या काळात अनेक दिवस माध्यमांपासून दूर असलेल्या खासदार नारायण राणे यांनी काल राज्यपालांना भेटून राष्ट्रपती राजवटीची मागणी केल्याने चर्चेला ऊत आला आहे.


शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची काल संध्याकाळी मातोश्रीवर भेट झाली. दोन नेत्यात दीड तास चर्चा झाली. कुणी सरकारच्या स्थिरतेबाबत बातम्यांचा धुरळा उडवीत असतील तर ती निव्वळ पोटदुखी समजावी. सरकार मजबूत आहे. चिंता नसावी, असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलंय. तर दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी 'कोरोनावर लस आणि ठाकरे सरकार पाडण्याचा डोस विरोधकांना सापडायचा आहे. संशोधन जारी है. विरोधकांनी तात्काळ क्वारंटाईन व्हावे हेच बरे. महाराष्ट्र अस्थिर करण्याचे प्रयत्न अंगलट येतील. बुमरॅंग...' असं म्हटलंय.


गेल्या तीन चार दिवसामध्ये नेमकं काय घडलं?
गेल्या तीन चार दिवसात राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. काल संध्याकाळी शरद पवार आणि संजय राऊत हे मातोश्रीवर गेले होते. यावेळी उद्धव ठाकरेंबरोबर बैठक झाली. यात विशेष उल्लेखनीय बाब अशी की सत्तास्थापनेच्या पेचात देखील शरद पवार यांनी मातोश्रीची पायरी चढली नव्हती. मग राज्यपालांच्या भेटीनंतर शरद पवार मातोश्रीवर का गेले? असा सवाल उपस्थित होतोय. तसेच ज्या दिवशी सकाळी म्हणजे 23 मे रोजी संजय राऊत सकाळी राज्यपालांना भेटले, त्या दिवशी संध्याकाळी 7.30 ला भाजप नेते किरीट सोमय्या ही राज्यपालांना जाऊन भेटले. यावेळी किरीट सोमय्या यांनी अॅम्ब्युलन्स विषयात निवेदन दिले असल्याची माहिती आहे. त्यांच्या नंतर लगेच रात्री 8.45 च्या सुमारास सचिव मिलिंद नार्वेकर देखील भेटले असल्याची माहिती आहे. 23 तारखेला परत सचिव नार्वेकर लगेच भेटीला का गेले? तसेच काल राज्यपालांच्या कर्टसी भेटीनंतर शरद पवार आणि संजय राऊत लगेच मातोश्रीवर का गेले? असेही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत.


सूचनांना राजकारण समजायचे असेल तर त्यांनी गैरसमजात रहावे, देवेंद्र फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

राष्ट्रपती राजवट लागू करण्याची नारायण राणेंची मागणी
सोमवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची शरद पवार यांनी भेट घेतली. त्यानंतर राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनीही राज्यपाल यांची भेट घेतली. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना थेट राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची जाहीर मागणी केली. कोरोना व्हायरसमुळे उद्भवलेली राज्यातील आणि मुंबईतील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. ही परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकार अपयशी झालं आहे. राज्याची अर्थव्यवस्था सुरळीत करण्यासाठी या सरकारकडे कोणतीही उपाययोजना नाही, त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा अशी मागणी नारायण राणे यांनी केली. महाविकास आघाडी सरकारची कोरोनाशी सामना करण्याची क्षमता नाही. राज्यपालांनी परिस्थिती हाताळण्यासाठी सूचना द्याव्यात. राज्यातील सरकारला नारळ द्यावा आणि राष्ट्रपती राजवट राज्यात लागू करावी, अशी मागणी नारायण राणे यांनी केली. राज्यात अनेकांनी उपासमार होत नाहीत. रोजगार उपलब्ध नाहीत. शिक्षण व्यवस्था कोलमडली आहे. ही परिस्थिती सरकारला हाताळता आलेली नाही, असा आरोप नारायण राणेंनी केला.

राज्य सरकार अपयशी, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा; नारायण राणेंचा 'ठाकरे' सरकारवर हल्लाबोल