मुंबई : केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी कर्जमाफीसंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची चिन्हं आहेत. हल्ली कर्जमाफीची मागणी करण्याची फॅशन आली आहे, असं व्यंकय्या नायडू मुंबईतील एका कार्यक्रमात म्हणाले.


'कर्जमाफी करावी, मात्र अत्यंत टोकाच्या परिस्थितीमध्ये. सध्या कर्जमाफीची मागणी करण्याची फॅशन आली आहे. कर्जमाफी हा अंतिम उपाय नाही' असं म्हणताना नायडूंची जीभ घसरली.

'नुसत्या लोकप्रिय घोषणा करण्यात अर्थ नाही. टीव्ही, मिक्सर, मंगळसूत्र लोकांना फुकट देण्यापेक्षा विकासाची कामं महत्त्वाची आहेत. निवडणुकांसाठी घोषणा फक्त आधी केल्या जायच्या. कर्जमाफी हा अंतिम उपाय नाही', असंही नायडू म्हणाले.

बँकांचा पैसा म्हणजे जनतेचाच पैसा आहे. गावचा विकास झाल्याशिवाय शेतकऱ्यांची स्थिती सुधारणार नाही, असंही नायडू म्हणाले.

नायडू यांचं वक्तव्य अत्यंत असंवेदनशील असल्याची टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची हौस नसते, असंही चव्हाण म्हणाले.