नागपूरमध्ये गेल्या 10 दिवसात हायटेन्शन वायरमुळे दोन जुळ्या भावंडांचा आणि त्यानंतर आणखी एका चिमुरड्याचा मृत्यू झाला होता. यानंतर हायकोर्टाच्या नागपूर खंडपिठानं महावितरण, महापारेषण, महानगरपालिका, नागपूर सुधार प्रन्यास, नगर विकास विभाग, ऊर्जा विभाग यांना नोटीस बजावली आहे.
तसंच या बाबतीत न्यायालयानं न्यायालयीन मित्र म्हणून वकिलाची नियुक्ती केली होती. याप्रकरणी आज गुरुवारी नागपूरमधील हायटेन्शन वायरच्या शॉकमुळे झालेल्या जुळ्या भावंडांच्या मृत्यूप्रकरणी पहिली कारवाई करण्यात आली आहे. जुळ्या भावंडांच्या मृत्यूप्रकरणी बिल्डर आनंद खोब्रागडेला अटक करण्यात आली आहे.
हायटेन्शन वायरच्या स्पर्शानं जुळ्या भावंडांचा मृत्यू
क्रिकेट खेळताना हायटेंशन वायरमधून विजेचा शॉक लागलेल्या जुळ्या भावंडांपैकी दुसऱ्या भावाचाही मृत्यू झाला आहे. दहा-बारा दिवसांपूर्वी विजेचा धक्का बसलेल्या एका भावाचा मृत्यू झाला होता.
मंगळवारी सकाळी 11 वर्षांच्या पियुष धरचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रियांश धर याचा 8 जून रोजी मृत्यू झाला होता.
31 मे रोजी सुगतनगर मधील आरमोर्स कॉलनीत आपल्या रो हाऊसच्या बाल्कनीत प्रियांश आणि पियुष ही 11 वर्षांची जुळी भावंडं क्रिकेट खेळत होती. त्यावेळी झाडात अडकलेला प्लॅस्टिकचा बॉल काढताना दोन्ही भावांना विजेचा शॉक लागला होता.
दोघंही भाऊ शॉकमुळे भाजले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. बारा दिवसांपूर्वी एका भावाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्यानंतर दुसऱ्या भावानेही प्राण सोडले आहेत.
नागपुरात पुन्हा हायटेन्शन वायरचा बळी, चिमुकल्याचा मृत्यू
5 वर्षाचा चिमुकला स्वयंम पांडे… मंगळवारी आईसोबत यशोदा शाळेत अॅडमिशन घेऊन आला. आईनं घरात पाऊल ठेऊन फक्त पाण्याचा तांब्याच उचलला, तेवढ्यात स्वयमनं घराची गच्ची गाठली. मात्र पुढे जे झालं त्याने प्रत्येकाचं मन हळहळलं.
11 हजार व्होल्टचा शॉक लागून स्वयंमचा कोळसा झाला. त्याची किंकाळी ऐकून आईसुद्धा गच्चीवर धावली, नशीबानं कुटुंबातल्या लोकांनी तिला आवरलं, म्हणून पुढचा अनर्थ टळला. हायटेन्शन वायरनं गेल्या काही दिवसात नागपुरात घेतलेला हा तिसरा बळी.
हिंगणा वीजकेंद्रातून नागपूरला वीजपुरवठा करणारी वायर एमआयडीसी भागातून जाते. इथं मोठा बाजारही भरतो. त्यामुळे जीव मुठीत घेऊन लोक इथं वास्तव्य करत आहेत.
संबंधित बातम्या :
बिल्डरची चूक, हायटेन्शन वायरच्या स्पर्शानं दोन भावंडं भाजली
हायटेन्शन वायरचा शॉक लागून जुळी भावंडं भाजली, एकाचा मृत्यू
क्रिकेट खेळताना शॉक लागलेल्या दुसऱ्या जुळ्या भावाचाही मृत्यू