मुंबई: प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या तुमच्या लाडक्या एबीपी माझा चॅनलने दहा वर्ष पूर्ण केली आहेत.

दहा वर्षापूर्वी आजच्याच दिवशी मराठी माणसाच्या साक्षीने एबीपी समूहानं मराठी पत्रकारितेत पाय ठेवलं आणि बघता-बघता महाराष्ट्राच्या घरा-घरात ”उघडा डोळे, बघा नीट” या ब्रीदवाक्यानं पोहोचलेलं एबीपी माझा लोकप्रिय झालं.

त्याच तुमच्या लाडक्या चॅनलची आज दशकपूर्ती होत आहे. या दहा वर्षात ‘माझा’नं प्रत्येक क्षेत्रातील, प्रत्येक घटकाची बाजू मांडत लोकशाही प्रक्रियेतील आपली भूमिका अधिकाधिक दृढ केली.

आमची भूमिका निभावण्याची संधी तुमच्या विश्वासामुळे आम्हाला लाभली. खरं तर त्या विश्वासाचीच ही दशकपूर्ती आहे. हे नातं पुढेही असंच कायम राहून काळाच्या रेषेवर उत्तरोत्तर अधिक घट्ट होईल, यात आम्हाला तिळमात्र शंका नाही.

मान्यवरांच्या प्रतिक्रिया 

शरद पवार, अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस 

"दहा वर्षे कधी संपली हे कळलंच नाही. अलिकडच्या काळात एबीपी माझा हे महाराष्ट्रातील विविध प्रश्नांच्या संबंधी अत्यंत जागरुकपणे काम करणारं एक चॅनल आहे. त्यामुळे साहजिकच लोकांना त्याची सवय झाली आहे. आता इतकी सवय झालीय की दहा वर्षे कधी झाली हे ध्यानात येत नाही. बोलता बोलता दहा वर्षे सामान्य लोकांचा विश्वास संपादन करण्यासंबंधी कामगिरी एबीपी माझाने केली, त्याबाबत त्यांचं अभिनंदन. वास्तवतेचं भान ठेवून सतत वृत्त देण्याची भूमिका त्यांनी इथून पुढेही घ्यावी, त्यासाठी शुभेच्छा              - शरद पवार  



 नितीन गडकरी, केंद्रीय रस्तेविकास मंत्री  

"एबीपी माझा 10 वर्षे पूर्ण करत आहे, त्याबद्दम माझ्या खूप खूप शुभेच्छा. विशेषत: महाराष्ट्रात आणि मराठी माणसांमध्ये गेली अनेक वर्षापासून एबीपी माझाचे कार्यक्रम अभिनव असतात. या कार्यक्रमाच्या माध्यमातून केवळ लोकांचं मनोरंजन करणं हा उद्देश नसतो, तर लोकांचं प्रबोधन करणं हा उद्देश असतो. विशेषत: एबीपी माझामध्ये इंटरव्यूव्ह देत असताना, मला विशेष रुपाने आनंद झाला. कारण सर्व प्रकारचे प्रश्न विचारल्यानंतर, आपल्या मनात काय, हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम त्यातून होतं".

  नितीन गडकरी, केंद्रीय रस्तेविकास मंत्री  




पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री

 "आज एबीपी माझाला 10 वर्ष पूर्ण होत आहेत. या वाहिनीने ग्रामीण आणि शहरी भागाची खूप सेवा केलेली आहे. सरकारचे निर्णय जनतेपर्यंत पोहोचवणे आणि जनतेचे आशा, आकांक्षा शासनकर्त्यांपर्यंत पोहोचवणं याचा दुवा म्हणून एबीपी माझाने काम केलं आहे.  नि:पक्षपाती रिपोर्टिंग करणं हे आजच्या युगात खूप अवघड झालेलं आहे. जनतेमध्ये विश्वास निर्माण करणं ही फार अवघड कामगिरी एबीपी माझाने पूर्ण केली आहे. एबीपी माझाच्या पुढच्या वाटचालीसाठी माझ्या शुभेच्छा"

                   - पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री




उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख

एबीपी माझाला दहा वर्षे पूर्ण झाली याबद्दल अभिनंदन. एबीपी माझाचं काम आणि त्यांचं एकूण वृत्तसंकलन खरोखरच चांगलं असतं. एबीपी माझाला मी मन:पूर्वक शुभेच्छा देतो. आज फक्त दहा वर्षे पूर्ण झालेली आहेत आणि वर्षानुवर्षे खूप चांगलं काम करत राहा, या शुभेच्छा.

उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख




राज ठाकरे, अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना

" 'माझा' माझ्यासाठी काय आहे, हे म्हणण्यापेक्षा 'माझा' हा महाराष्ट्रासाठी काय आहे, हे सर्वात महत्त्वाचं आहे. लोकांना वाटतं की मी इथे बातमी पाहिल्यानंतर खात्रीलायक बातमी समजते. विश्वासार्हता खूप मोठी आहे आणि  ती एक जबाबदारी आहे. ती जबाबदारी चॅनेल म्हणून खूप चांगल्यारितीने पार पाडत आहेत. स्टार गेलं आणि एबीपी आलं, तरी चॅनेल हा शेवटी 'माझा' आहे, ही आपुलकीची भावना असल्यामुळे, नावाने काही फरक पडला नाही. उत्तरोत्तर चॅनेलची प्रगती होत राहीलच यात शंका नाही. शुभेच्छा "

राज ठाकरे, अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना 




सुधीर मुनगंटीवार, अर्थमंत्री 

ज्या वाहिनीच्या नावात माझा आहे, त्यामुळे प्रत्येकाला ही वाहिनी आपलीच वाटते. एबीपीच्या स्लोगनप्रमाणे 'उघडा डोळे, बघा नीट' ही प्रत्येकाची जबाबदारी आहे की प्रत्येकाने नीट बघून काम केलं पाहिजे.

आपल्या वाहिनीच्या माध्यमातून 'वार्ता नव्हे कर्ता' ही भावना व्यक्त होते. कोणत्याही राजकीय पक्षाचा आपल्यावर दबाव आहे असं वाटत नाही, हे एबीपी माझाचं वैशिष्ट्य आहे. लोकांना न्याय देणं, दीन-दलित, शोषितांच्या मागे उभे राहणे हे एबीपी माझाचं वैशिष्ट्य आहे. म्हणूनच 10 वर्ष लोकप्रियता टिकली, पुढचे 50 वर्ष हीच लोकप्रियता टिकावी.