लातूर : लिंगायत धर्माला संवैधानिक मान्यता देण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी आज लातूर येथे लिंगायत समन्वय समितीच्या वतीने महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. या मोर्चात महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश येथील लाखो लिंगायत समाज बांधवांनी सहभाग घेतला.


लातूरच्या क्रीडा संकुल येथून हा मोर्चा पाच किलोमीटरचं अंतर पायी जात जिल्हाधिकारी कार्यलयावर पोहोचला. या ठिकाणी या मोर्चाचं नेतृत्व करणाऱ्या चाळीस धर्मगुरूंनीही सहभाग घेतला होता. त्यापैकी अहमदपूरकर महाराज यांनी मोर्चा काढण्यामागचा उद्देश सांगितला.

लिंगायत समाजाच्या मागण्या

मोर्चेकऱ्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. त्यात मुख्य पाच मागण्या मांडण्यात आल्या आहेत.

  • लिंगायत धर्माला संवैधानिक मान्यता प्रदान करावी

  • लिंगायत धर्माला धार्मिक अल्पसंख्यांक वर्गामध्ये समाविष्ट करावं

  • राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावं

  • 2021 मध्ये होणाऱ्या राष्ट्रीय जनगणनेत लिंगायत धर्माच्या लोकसंख्येची स्वत्रंत्र नोंद घेण्यात यावी

  • लिंगायत धर्माचे मूळ साहित्य कन्नड भाषेत आहे. त्याचे इतर भाषेत अनुवाद करण्यासाठी स्वत्रंत मंडळाची स्थापना करावी