बीड: मागच्या चार-पाच वर्षात या वर्षी पहिल्यांदाच मृग नक्षत्रात शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. सुरुवातीलाच दमदार पावसामुळे पेरलेलं उगवलंसुद्धा मात्र त्यानंतर गायब झालेला पाऊस अद्याप तरी परतला नाही. आता पंधरा दिवस होत आलेत तरी मराठवाड्यात एकही दमदार पाऊस झालेला नाही. मराठवाड्यातील तब्बल 37 तालुक्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे. यंदा चांगला पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. त्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पेरण्या केल्या. मात्र गेल्या दोन आठवड्यापासून पावसाने दांडी मारल्याने दुबार पेरणीच संकट शेतकऱ्यावर ओढावलं आहे. आषाढी एकादशीला विठ्ठलाच्या दर्शनानंतर वारकरी घराकडे परत फिरल्यावर पाऊससुद्धा परततो अशी भावना भोळ्या भाबड्या शेतकऱ्यात असते. आता थकले भागलेले वारकरी घरी पोहचले खरे मात्र पावसाची प्रतीक्षा कायम आहे. मराठवाड्यामध्ये सुरुवातीला पावसाने दमदार हजेरी लावली. त्यानंतर शेतकऱ्यांनी मूग, कापूस, सोयाबीन, तूर, उडीद या पिकांची पेरणी केली. हे पिक उगून देखील आलं मात्र, आता पावसाचा खंड पडल्यामुळे हलक्या जमिनीतली पिकं करपू लागली आहेत. पांढरवाडी गावच्या अर्जुन टाकले यांनी अडीच एकरावर तूर आणि कापसाची लागवड केली होती. मात्र आता पावसाने पंधरा दिवसापासून दांडी मारल्याने त्यांनी या पिकात नांगर घातला आहे. कारण आता दुबार पेरणीशिवाय पर्यायच राहिला नाही. यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. त्यानंतर बीड जिल्ह्यातील नव्वद टक्के शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरण्या पूर्ण केल्या आहेत. मात्र गेल्या पंधरा दिवसापासून पावसाचा एक टिपूसही पडलेला नाही. आकाशात रोज काळे ढग जमा होतात मात्र सोसाट्याच्या वाऱ्याने ते पुढे जात आहेत. त्यामुळे जमिनीत राहिलेली थोडी फार ओल सुकून चालली आहे तर कुठे जमिनीला भेगा पडल्या आहेत. येत्या चार-पाच दिवसात वरूणराजा बरसला नाही तर पिके पूर्णतः जळून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. जोरदार पावसाअभावी मराठवाड्यातल्या छोट्या मोठ्या धरणामध्ये अजून पुरेसा पाणी साठा झालेला नाही. त्यामुळे अनेक शेतकरी मुबलक पाण्यावर पिकला पाणी देण्यासाठी ठिबक आणि स्पिंक्लरचा वापर करत आहेत. मराठवाड्यातल्या 37 तालुक्यामध्ये अजूनही सरासरीएवढा पाऊस झालेला नाही. त्यामध्ये बीड जिल्ह्यातल्या गेवराई माजलगाव आणि वडवणी तालुक्यातल्या शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची आस लागली आहे. हजारो रुपये खर्च करून पेरणी तर केली मात्र उगलं ते पिकवायचं कसं हा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. मराठवाड्यातील 71 तालुक्यांपैकी 37 तालुक्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे.   औरंगाबाद जिल्हा तालुका        या वर्षी पडलेला पाऊस      अपेक्षित पावसाची टक्केवारी सोयगाव   ----- 118 मिली.........................66% पैठण     -------82  मिली..........................57% औरंगाबाद -------151  मिली..........................94% गंगापूर   -------109  मिली..........................73% खुलताबाद -------151  मिली..........................66% जालना  जिल्हा तालुका        या वर्षी पडलेला पाऊस      अपेक्षित पावसाची टक्केवारी जालना    ----- 147 मिली.........................52% बदनापूर   -------115  मिली..........................59% परतूर     -------137 मिली..........................85% अंबड     -------155  मिली..........................82% घनसांगवी  -------151  मिली..........................82% परभणी  जिल्हा तालुका        या वर्षी पडलेला पाऊस      अपेक्षित पावसाची टक्केवारी परभणी  ----- 151 मिली.........................82% पालम   ------- 96  मिली..........................70% पूर्णा     -------137  मिली..........................75% गंगाखेड  ------- 117 मिली..........................85% पाथरी  -------  96 मिली..........................57% जिंतूर  -------  116 मिली..........................65% मानवत -------  129 मिली..........................81% हिंगोली  जिल्हा तालुका        या वर्षी पडलेला पाऊस      अपेक्षित पावसाची टक्केवारी   कळमनुरी  ----- 113 मिली.........................51% वसमत  ------- 149  मिली..........................81% नांदेड  जिल्हा तालुका        या वर्षी पडलेला पाऊस      अपेक्षित पावसाची टक्केवारी अर्धापूर  -----  193 मिली.........................85% भोकर   ------- 186 मिली..........................85% उमरी   ------- 115 मिली..........................52% लोहा  -------  157 मिली..........................79% किनवट ------- 218 मिली..........................93% माहूर   ------- 172 मिली..........................73% हदगाव  ------- 195 मिली..........................90% हिमायतनगर -----110 मिली.........................51% देगलूर  ------- 115 मिली..........................57% बिलोली  ------- 158 मिली..........................75% धर्माबाद  ------- 153 मिली..........................75% नायगाव  ------- 203 मिली..........................63% मुखेड    ------- 145 मिली..........................75% बीड   जिल्हा तालुका        या वर्षी पडलेला पाऊस      अपेक्षित पावसाची टक्केवारी गेवराई   ----- 119 मिली.........................71% वडवणी  ------- 139 मिली..........................89% माजलगाव -------138  मिली..........................85% परळी   ------- 151 मिली..........................90% लातूर  जिल्हा तालुका        या वर्षी पडलेला पाऊस      अपेक्षित पावसाची टक्केवारी जळकोट    ----- 208 मिली.........................85% दुष्काळानंतर गेल्या वर्षी परतीच्या पावसाने अनेक पिकांना जीवदान मिळाल होतं. तर मोठ्या प्रमाणात जलाशयात पाणीसाठा जमा झाला होता. मात्र या वर्षी दुबार पेरणीचे ढग पुन्हा आकाशात जमा होऊ लागले आहेत. त्यामुळे बळीराजा संकटात सापडला आहे.