मुंबई : राज्यात महाविकास आघाडीचं ठाकरे सरकार येणार आहे. या सत्तांतरामुळे विधानसभा निवडणुकीआधी पक्षांतर केलेल्या अनेक नेत्यांना मोठा फटका बसला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांची यादी मोठी आहे. मात्र या नेत्यांचा अंदाज चुकल्याने सत्तेच्या लोभापाई शिवसेना-भाजपमध्ये गेलेल्या या नेत्यांची निराशा झाली असून त्यांना विरोधातचं बसावं लागणार आहे. यामध्ये नेत्यांमध्ये राधाकृष्ण विखे पाटील, गणेश नाईक, दिलीप सोपल, कालिदास कोळंबकर, नारायण राणे, नितेश राणे इत्यादी नेत्यांचा समावेश आहे. इतर पक्षातून येणाऱ्या नेत्यांची संख्या पाहत भाजपने याला मेगा भरती नाव दिलं होतं. अशा तीन मेगा भरती निवडणुकीआधी झाल्या होत्या.


राधाकृष्ण विखे पाटील


पाच वर्ष कॉंग्रेसचा विरोधी पक्षनेता म्हणून काम केल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील अचानक भाजपमध्ये गेले आणि त्यांना मंत्रीपदही मिळालं. मुलगा सुजयच्या लोकसभा तिकीटावेळी झालेल्या मतभेदानंतर पक्ष सोडल्याचं त्यांनी सांगितलं. विधानसभा निवडणुकीत त्यांचा विजय झाला मात्र तरीही त्यांना आता विरोधी पक्षातच बसावं लागणार आहे. राधाकृष्ण विखे पाटील जर कॉंग्रेसमध्ये असते, तर ज्येष्ठतेनुसार उपमुख्यमंत्रीपदावरही दावा त्यांचाच राहिला असता.


गणेश नाईक


गणेश नाईक ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे मोठे नेते होते. संपूर्ण नवी मुंबई महापालिकेवर त्यांचं वर्चस्व आहे. मात्र भाजपबरोबर विधानसभा निवडणुकी आधी त्यांनी भाजपची वाट धरली. त्यांचे चिरंजीव संदीप नाईक यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपने संदीप नाईकांना ऐरोलीतून तिकीट दिलं, मात्र गणेश नाईक यांना भाजपने तिकीट नाकारलं होतं. मात्र मुलाच्या जागी गणेश नाईक यांनी स्वत: लढले आणि जिंकले. आज गणेश नाईक राष्ट्रवादीबरोबर असते तर ते मंत्री नक्कीच झाले असते. कारण यापूर्वी आघाडी सरकारमध्ये पूर्ण 15 वर्ष ते मंत्रिपदी होते.


दिलीप सोपल


सोलापूर जिल्ह्यातील एकेकाळचे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते होते. मात्र त्यांनी शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढली आणि हरले. शिवसेनेकडून त्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता नाही, मात्र राष्ट्रवादीत असते तर नक्की मंत्री झाले असते.


कालिदास कोळंबकर


कालिदास कोळंबकर मुंबईतील कॉंग्रेसचे ज्येष्ठ आमदार आहेत. वडाळा मतदारसंघातून निवडून येण्याचा रेकॉर्ड केला आहे. आता भाजपत असल्याने त्यांची मंत्रिपदाची संधी गेली आहे. कोळंबकर कॉंग्रेसमध्ये असते तर मंत्रिपद मिळण्याची शक्यता होती.


नारायण राणे


नारायण राणे यांनी खुप काळ वाट पाहिल्यावर विधानसभा निवडणुकीआधी अखेर भाजपत अधिकृत प्रवेश केला. मात्र त्यंच्यावर पुन्हा विरोधीपक्षातच बसण्याची वेळ आली आहे.


शिवेंद्रराजे भोसले


साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी माजी खासदार उदयनराजे यांच्याशी फारसं पटत नसल्याने भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. मात्र शिवेंद्रराजेंपाठोपाठ उदयनराजेंनीही भाजपवासी झाले. शिवेंद्रराजे निवडून आले मात्र त्यांची मंत्रिपदाची संधी गेली.


वैभव पिचड


राष्ट्रवादीतील मोठं नाव असलेल्या मधुकरराव पिचड यांनी चिरंजीव वैभव पिचड यांच्यासह निवडणुकीआधी भाजपमध्ये प्रवेश केला. अहमदनगरमधील पिचड कुटुंबाची 40 वर्षांच्या सत्तेला राष्ट्रवादीच्या डॉ. किरण लहामटे यांनी सुरुंग लावला. मधुकर पिचड हे आघाडी सरकारमध्ये काळात मंत्री होते. त्यामुळे वैभव पिचड यांनाही मंत्रीपद मिळण्याची शक्यता होती.


हर्षवर्धन पाटील


भाजपत प्रवेश केलेले हर्षवर्धन पाटील कॉंग्रेसच्या कोअर कमिटीचे सदस्य होते. इंदापूरच्या जागेसाठी पवारांबरोबरच्या मतभेदातून पक्षबदल केल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र तरीही त्यांना निवडुणकीत पराभव पत्करावा लागला. हर्षवर्धन पाटील काँग्रेसमध्ये असते तर ज्येष्ठतेमुळे मनंत्रीपदावर दावा असता.


राणा जगजित सिंह पाटील


राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते पद्मसिंह पाटील यांचे चिरंजीव राणा जगजीत सिंह यांनी अगदी शेवटच्या क्षणी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपच्या तिकीटावर ते निवडून आले आहेत. जर ते राष्ट्रवादीत असते तर शरद पवारांचे नातलग म्हणून त्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता राहिली असती. मात्र आता त्यांना विरोधी पक्षात बसावं लागणार आहे.


जयकुमार गोरे


भाजपच्या शेवटच्या मेगाभरतीमध्ये जयकुमार गोरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. कॉंग्रेसमध्ये सातारा जिल्ह्यातील युवा नेतृत्व म्हणून त्यांचं नाव होतं. जयकुमार गोरे भाजपच्या तिकीटावर निवडून आले आहेत, मात्र त्यांना विरोधी पक्षात बसावं लागणार आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये असते तर त्यांना किमान राज्यमंत्रीपद मिळालं असतं.