मुंबई : महाराष्ट्राच्या राज्यपालपदावरुन भगत सिंह कोश्यारी यांना हटवण्याची शक्यता आहे. तर राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्रा यांची वर्णी लागण्याची चिन्हं आहेत. सत्ता स्थापनेच्या घडामोडीत महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी चर्चेचा केंद्रस्थानी आले होते. फडणवीस यांना शनिवारी सकाळीच मुख्यमंत्रिपदाची शपथ दिल्यानं राज्यपालांवर टीकाही झाली होती. त्याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकार त्यांची उचलबांगडी करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर दुसरीकडे राजस्थानच्या राज्यपालपदी असलेल्या कलराज मिश्र यांना महाराष्ट्रात राज्यपाल म्हणून आणण्याची अटकळ बांधली जात आहे. राज्यातली सत्ता हातातून गेल्यानंतर भाजपानं प्रतिमा संवर्धनासाठी हा खटाटोप चालवल्याचीही चर्चा आहे.


कोण आहेत कलराज मिश्र ?
हिमाचल प्रदेशाच्या राज्यपालपदानंतर कलराज मिश्र यांची 9 सप्टेंबरला राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आले. उत्तर प्रदेशाचे ज्येष्ठ नेते असणारे मिश्र राज्य आणि केंद्रीय मंत्रीपदी ते होते. मिश्र राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. मिश्र यांनी उत्तर प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष म्हणून देखील काम पाहिले आहे.

सत्तास्थापनेच्या तिढ्यात राज्यात अखेर राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. सत्तास्थापन करण्यात सर्व पक्ष असमर्थ ठरल्याने राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी हा निर्णय घेतला. यानिमित्ताने भगत सिंह कोश्यारी हे राज्याच्या केंद्रस्थानी आलेले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आहेत तरी कोण? त्यांचा संघ आणि भाजपमधला प्रवास कसा झाला? याबद्दल जाणून घेऊयात.
 या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या कारकिर्दीवर एक नजर -

17 जून 1942 ला उत्तराखंडच्या पालनधुरा गावात भगत सिंह कोश्यारी यांचा जन्म
इंग्रजी विषयात पदव्युत्तर पदवीचं शिक्षण 1964 मध्ये अलमोरा विद्यापीठातून पूर्ण
याच काळात कॉलेजचे सरचिटणीस म्हणून कोश्यारी निवडून आले होते
1979 ते 1991 या काळात कुमाऊँ विद्यापीठाचे काऊन्सिलवर निवडून गेले
लहानपणापासून संघात कार्यरत, आणीबाणीच्या काळात इंदिरांविरोधात आंदोलनं
मिसा कायद्याअंतर्गत 1975 ते 1977 अशी दोन वर्ष तुरुंगवासही भोगला
1997 साली भगत सिंह कोश्यारी पहिल्यांदा यूपी विधानसभेवर निवडून आले
यूपीच्या विभाजनानंतर 2000 साली उर्जा आणि सिंचन खात्याचे मंत्री झाले
2001 - नित्यानंद स्वामी यांच्या जागी भाजपनं त्यांची मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती केली
2002 मध्ये उत्तराखंडमध्ये भाजप पराभूत, त्यानंतर 2007 पर्यंत विरोधी पक्षनेते
2008 मध्ये भगत सिंह कोश्यारी उत्तराखंडमधून राज्यसभेवर निवडून गेले
2014 मध्ये नैनीताल मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले
5 सप्टेंबरला विद्यासागर राव यांच्यानंतर महाराष्ट्राचे राज्यपाल झाले
अविवाहित असलेल्या कोश्यारींनी पत्रकार आणि प्राध्यापक म्हणून काम केलं
'पर्वत पियुष' नावाचं साप्ताहिक काढलं आणि चालवलंही
'उत्तरांचल प्रदेश क्यों?' आणि 'उत्तरांचल संघर्ष एवंम समाधान' ही दोन पुस्तकं लिहिली