Devendra Fadnavis : माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे आज दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यांच्या सागर या निवासस्थानी ही पत्रकार परिषद होणार आहे. यामध्ये देवेंद्र फडणवीस हे परमवीर सिंग, अनिल देशमुख, रश्मी शुक्ला फोन टॅप प्रकरण तसेच नवाब मलिक यांच्याविषयी भाष्य करण्याची शक्यता आहे. सध्या राज्यात या मुद्यावरुन राजकीय वातावरण तापले आहे. राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. दरम्यान, आज देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषदेत नेमकं काय बोलणार याकडं सर्वांचे लक्ष लागले आहे.
 
दरम्यान, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कालच देवेंद्र फडणीस यांनी आशिष शेलार यांच्यासोबत राजभवन इथे जाऊन राज्यपालांची भेट घेतली होती. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. त्यातच आज देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषद घेत असल्याने सगळ्यांच्या नजरा आता देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लागल्या आहेत.


मागच्या चार दिवसापूर्वी सभागृहात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर गंभीर आरोप केले होते. राज्य सरकारचे विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांचे कार्यालय हे विरोधकांची कत्तल कशी करायची याचं कारस्थान शिजण्याचं मुख्य ठिकाण आहे. त्याच ठिकाणी गिरीश महाजन यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्याचा कट रचल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. 


विशेष सरकारी वकील असलेले प्रवीण चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप करणारे व्हिडीओ असलेला एक पेन ड्राईव्ह देवेंद्र फडणवीसांनी विधानसभा अध्यक्षांकडे दिला होता. त्यामध्ये गिरीश महाजन यांच्यावर गुन्हा दाखल करताना कशा प्रकारचं कट कारस्थानं सरकारचं रचतंय याचा खुलासा करणारे अनेक व्हिडीओ असल्याचा दावा देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. सव्वाशे तासांचे हे व्हिडीओ सभागृहात दाखवले तर सभागृहाची इभ्रत जाईल असंही ते म्हणाले. या व्हिडीओच्या 20 ते 25 वेब सीरीज होतील असाही टोलाही त्यांनी सभागृहात लगावला होता. त्यामुळे सरकारची चांगलीच कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले होते.  


महत्त्वाच्या बातम्या: