Untimely rain : सध्या राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पाऊस सुरु आहे. या अवकाळी पावसाचा खूप मोठा फटका राज्यातील शेतकऱ्यांना बसत आहे. कारण एकीकडे वादळी वाऱ्यासह होणारा अवकाळी पाऊस तर दुसरीकडे अनेक ठिकाणी होणारी गारपीट. यामुळं उभी पिकं जमिनदोस्त होत आहेत. राज्यातील नांदेड, धुळे, अहमदनगर, पालघर, नाशिक या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा चांगलाच फटका बसला आहे. या अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा, मका, द्राक्ष, केळी, कांदा, टोमॅटो या पिकांना मोठा फटका बसला आहे.


नांदेड 


नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोराचा पाऊस झाला. सध्या अनेक शेतकरी गहू, हरभरा काढणीत व्यस्त आहेत. मात्र, या पावसामुळे काढणीत व्यत्यय आला आहे. तसेच पिकांचं नुकासनही झालं आहे. नांदेड जिल्ह्यात काल रात्री वादळी वारा, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसानं हजेरी लावली. दरम्यान नांदेड, अर्धापुर, हदगाव या तालुक्यामध्ये सायंकाळी मेघगर्जनेसह अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. उशिरापर्यंत चालू असलेल्या पावसामुळं हवेत मात्र गारवा निर्माण झाला आहे. 




नाशिक


नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कांदा, द्राक्ष पिकांचे क्षेत्र आहे. काही ठिकाणी कांद्याची काढणी सुरु देखील आहे. अशातच अवकाळी पाऊस जाल्याने कांदा पिकाला फटका बसला आहे. तसेच द्राक्ष पिकालाही मोठा फटका बसला आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या चिंतेत असल्याचे चित्र आहे. दिल्ह्यातील दिंडोरी, सटाणा या भागात अवकाळी पाऊस झाला आहे.


अहमदनगर


नगर जिल्ह्यातही अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली आहे. यामुळे शेतीपिकाचे मोठे नुकसान झाले आहे. नगर जिल्ह्यातील संगमनेर, अकोले,  सिन्नर, पारनेर या ठिकाणी अवकाळी पाऊस झाला आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळं गहू पडला आहे. कांदे कढायला आहेत. तसेच  झेंडूच्या पिकासह टोमॅटो पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे कांदा बीजोत्पादन व गुणवत्ता हे दोन्ही बाधित होण्याची शक्यता आहे.




धुळे


धुळे जिल्ह्यातही अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली आहे. याचा मोठा फटका शेतीपिकांना बसला आहे. या ठिकाणी देखील हरभरा, गहू पिकांचीकाढणी सुरु असातानाच अवकाळी पाऊस सुरु झाल्यानं पिकांना फटका बसला आहे.


पालघर 


पालघर जिल्ह्यातील जव्हार मोखाडा वाडा डहाणू या तालुक्यातील काही भागात अवकाळी पाऊस  आणि गारपिटीमुळे  शेतकरी बागायतदार पुन्हा एकदा संकटांत सापडला आहे. हंगामाच्या प्रारंभी आंबा काजू जांबु पिकाची  फळगळती होऊन आर्थिक नुकसानीची भीती बागायतदारांनी व्यक्त केली आहे. दरम्यान उपाययोजना अंमलात आणण्याचे मार्गदर्शन कृषीतज्ञांनी शेतकऱ्यांना केले आहे. 


महत्त्वाच्या बातम्या: