पंढरपूर : कोरोनाच्या संकटाने जगण्याचे सगळेच अर्थ बदलले आहेत. आता हे संकट कमी झाल्यावर समाज पुन्हा हळूहळू रुळावर येत असला तरी लॉकडाऊन नंतर पुन्हा नव्याने उभे राहणे हे सगळ्यांसाठीच एक आव्हान आहे. असेच आव्हान कायम दिव्यांच्या झगमगाटात, वाद्यांच्या बेधुंद आवाजात आणि रसिकांच्या गर्दीत असलेली लावणी आता मास्क, सोशल डिस्टन्स आणि सॅनिटायझरच्या नवीन संस्कृतीत उभी राहण्याची धडपड करू लागली आहे.


राज्य सरकारने नऊ महिन्यानंतर लावणी सादर करणाऱ्या कलाकेंद्रांना सुरु करायची परवानगी दिली आणि राज्यातील कलाकेंद्र चालकांसह हजारो लावणी कलावंतांना दिलासा मिळाला. कोरोनाचा काळ ही आयुष्यातील अतिशय वाईट अनुभव देणारी, उपासमार करायला लावणारी असल्याने पुन्हा कलाकेंद्र सुरु होताच गावोगावी परतलेले हे हजारो कलावंत आपापल्या कलाकेंद्रात पुन्हा नव्याने आयुष्य सुरु करण्यासाठी दाखल होऊ लागले आहेत.


यात पुन्हा उभे राहताना कोरोनाची भीती सगळ्यांच्याच मनात असली तरी कलाकेंद्राकडे वळणाऱ्या रसिक वर्गाला मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करायला लावणे, लावणी कलावंतांना सुरक्षित ठेवणे हे फारच मोठे आव्हान असल्याचे कलाकेंद्र मालकांसमोर आहे. यातूनही आता ही थिरकणारी लावणी आता आपल्या पायावर उभे राहण्यासाठी धडपडत आहे.


पुन्हा नव्याने सुरुवात करताना भीती सगळ्यांच्याच मनात आहे. पण स्वतःचे व कुटुंबाचे पोट भरणे असल्याने सर्व त्रास सोसत हे कलावंत कामाला लागले आहेत. यांचा दिवस दुपारनंतर सुरु होत असला तरी सगळे त्रास विसरून रसिकांच्या समोर जाताना त्यांना वारंवार मेकअप करून चेहऱ्यावर नकली रंग आणि भाव आणावेच लागतात. कलाकेंद्रातील कलावंताचे देखण्या रुपाला रसिक फिदा होत असले तरी त्यांना खुश करण्यासाठी पायात चार चार किलोची घुंगरे बांधून नाचताना होणाऱ्या वेदना पोटाच्या आगीपेक्षा नक्कीच कमी असतात. ही घुंगरे बांधून सिमेंटच्या स्टेजवर किंवा झगझगीत टाइल्सवर तीन तीन तास नाचल्यावर रात्री पाठ टेकल्यावर या वेदना डोळे मिटू देत नाहीत हे वास्तवही या कलावंत बोलून दाखवतात.


लावणी कलावंतांना शरद पवारांची मदत, 5 हजार कलावंतांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात


नव्याने काम सुरु केलेल्या रूप परितेकर या तरुण कलावंताला पायातील या 8 किलो वजनाच्या घुंगराचा त्रास चांगलाच जाणवतो. पण पोटासाठी करावे लागणार याचीही तिला जाणीव आहे. तर गेली वीस वर्षे हेच घुंगरू पायात बांधून कला सादर करणाऱ्या सुनीता वानवडेकर यांना यावर वैद्यकीय उपचार घ्यावे लागत आहेत. या कलावंतांचे झगमगाटात दिसणाऱ्या दृश्य जीवनामागे सतत दिव्याचे लखलखाट, वाद्यांचे कर्णकर्कश्य आवाज, रसिकांच्या शरीर भेदणाऱ्या नजरा आणि सातत्याने मेकअप करून या अवजड घुंगरांशी असलेली दोस्ती या लपलेल्या वेदना सर्वसामान्यांना कळतंच नाहीत.


आता पुन्हा नव्याने व जोमाने सुरुवात होऊ लागली असून सायंकाळी 5 वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत विविध पार्ट्यांच्या बैठक आणि रंगमंचावरील कार्यक्रमात या कलावंत आता रमून जाण्याचा प्रयत्न करीत असून या 9 महिन्यात अनेक गोष्टी बदलल्या आहेत. पण हा सर्व झगमगाटाचा दिखावा किती अशाश्वत आहे याची चपराक या कोरोनाच्या काळात भोगल्यानंतर आता प्रत्येक कलावंताला पुन्हा कलाकेंद्र बंद पडू नयेत यासाठीच प्रार्थना करावी लागतेय. ढोलकीपटू, हार्मोनियम, तब्बलजी असे साथसंगत करणारे कलावंतही याच लावणी कलाकारांच्या मदतीने आपली उपजीविका चालवत असतात. आता कोरोनामुळे कलाकेंद्र मालकांची अवस्थाही बिकट बनली आहे. गेले 9 महिने उत्पन्न बंद आणि कर्जाचे डोंगर डोक्यावर अशा स्थितीत शेकडो कलावंताचे पालकत्व असल्याने कोरोनाकाळात घरी बसलेल्या कलावंतांना आर्थिक मदतही द्यावी लागत होती.


आता किमान कलाकेंद्र सुरु झाल्याने थोडेफार उत्पन्न मिळण्यास सुरुवात झाली असली तरी शासनाने या कर्जाबाबत विचार करण्याची मागणी पद्मालय कलाकेंद्राचे मालक अभय तेरदले करीत आहेत. या संपूर्ण कोरोना काळात राज्यातील 5 हजारांपेक्षा जास्त कलावंतांच्या मदतीला केवळ शरद पवार धावून आले आणि त्यांनी प्रत्येकाला आर्थिक मदत पोचवल्याचे लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष अरुण मुसळे सांगतात. कोरोनाच्या संकटातून पुन्हा नव्याने उभारण्यासाठी आणि कलाकेंद्र मालकांच्या डोक्यावर असलेल्या कर्जाच्या व्याजासाठी राज्य सरकारने मदत करण्याचे साकडे शरद पवार यांना घालणार असल्याचे मुसळे सांगतात. आता पुन्हा रसिकांची वाहने कलाकेंद्राकडे वळू लागली आहेत. कलाकेंद्रातून ढोलकीचा कडकडाट आणि घुंघरांची छमछम देखील सुरु झाल्याचे आवाज पंचक्रोशीत घुमू लागलेले असताना प्रत्येकाला मात्र काळजी आहे ती एखादा कोरोनाग्रस्त रसिक आला तर काय आणि याच धास्तीत सध्या घुंगरासह थिरकणारे पाय सावध रीतीनेच थिरकत आहेत.