पंढरपूर : कोरोनाच्या संकटामुळे सर्वच व्यवसाय ठप्प झाले असताना महाराष्ट्राचे मनोरंजन करणाऱ्या लावणी कलावंतांचेही हाल सुरु झाले आहेत. राज्यातील या लावणी कलावंतांच्या मदतीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पुढे आले आहेत. राष्ट्रवादी वेलफेअर फंडातून हातावर पोट असणाऱ्या पाच हजार कलावंतांच्या बँक खात्यात तीन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे.


गावोगावी असलेल्या विविध लोकनाट्य कलाकेंद्रातून शेकडो लावणी कलावंत मनोरंजन करुन आपले पोट भरत असतात. मात्र पहिल्या लॉकडाऊनच्या वेळी या सर्व कलावंतांना आपापल्या गावाकडे जाण्यास सांगण्यात आले होते. राज्यात जवळपास 53 ठिकाणी 330 लोकनाट्य कलाकेंद्र असून यात पाच हजारांच्या आसपास लावणी कलावंतांचे सध्या हाल सुरु आहेत. लॉकडाऊननंतर हे कलावंत गावाकडे गेल्यावर त्यांच्या हालास सुरुवात झाली होती.



याबाबत कलावंतांसाठी काम करणाऱ्या संघटनेचे अध्यक्ष अरुण मुसळे यांनी याबाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार या दोघांकडेही मदतीसाठी प्रयत्न सुरु केले होते. याबाबत लक्ष्मण माने यांनी पुढाकार घेत शरद पवार यांना या लावणी कलावंतांची व्यथा सांगितली. यावेळी पवार यांनी सर्व परिस्थिती समजून घेत मदत करण्याचे आश्वासन दिले होते. यानंतर लावणी कलावंतांच्या संघटनेने राज्यातील सर्व कलावंतांची नावे, बँक खाते नंबर शरद पवार यांच्याकडे दिल्यावर त्यांनी राष्ट्रवादी वेलफेअर फंडातून प्रत्येक कलावंतासाठी तीन हजार रुपयांची मदत देण्यास सुरुवात केली.


आजपासून अनेक कलावंतांच्या बँक खात्यात शरद पवार यांनी पाठवलेली तातडीची आर्थिक मदत जमा होण्यास सुरुवात झाल्याने काही दिवसांसाठी या कलावंतांचा प्रश्न आता सुटू शकणार आहे. शरद पवार यांच्याकडून राज्यातील सर्व लावणी कलावंतांना झालेल्या आर्थिक मदतीसाठी अरुण मुसळे यांनी शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आभार मानले आहेत .