चंद्रपूर : शीतल आमटेंच्या आत्महत्येनंतर 13 दिवस पूर्ण होताच त्यांचे पती गौतम करजगी आणि मुलगा शर्विल हे पुण्याला रवाना झाले आहे. महत्वाचे म्हणजे आता गौतम आणि शर्विल हे आनंदवनात वापस येणार का? यावरही प्रश्न चिन्ह आहे. कारण "आता आमची गरज आहे का? हे आम्हाला नाही तर आनंदवनाला ठरवायचंय" अशी भूमिका गौतम करजगी यांनी घेतल्याची कळतंय. विशेष म्हणजे समाजाला इतके भरभरून दिलेल्या, हजारो लोकांना जगण्याचे बळ देणाऱ्या आनंदवनात आमटे परिवारातील शीतल यांची आत्महत्या आणि परिवारातील ताटातूट ही दुर्दैवीच म्हणावी लागेल.


डॉक्टर शीतल आमटे यांनी आत्महत्या केली. पाठीमागे त्यांचे पती गौतम करजगी आणि 6 वर्षांचा चिमुकला शर्विल आहेत. रविवारी शीतल आमटेंच्या मेडिकल कॉलेजच्या मित्र मंडळींनी आणि इतर स्नेही मंडळींनी आनंदवनात शोकसभा घेतली. शीतल आमटेंच्या मृत्यूनंतर 13 दिवस पूर्ण झाले पण दुरावलेली मनं जुळण्याऐवजी मात्र अजूनच दूर गेली हे दुर्दैवी. याला कारणीभूत ठरले ते म्हणजे शीतलच्या शोकसभेला आमटे परिवारातील तसेच ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांपैकी एक ही व्यक्ती उपास्थित नसणे.


एकीकडे शीतल आमटेंचा एक वाद हा भाऊ कौस्तुभ बरोबर होता. काही काळ आनंदवनातून दूर असणारे कौस्तुभ आता परत इथल्या कामात वापस आले आहेत. बदललेल्या समीकरणात त्यामुळे गौतम करजगी यांची काय भूमिका आहे, याबाबत नक्कीच संभ्रम आहे. शीतल आनंदवनात लग्नानंतर वापस आल्या. त्यांनी आनंदवनात काम सुरू केले आणि गौतम करजगी यांनीही त्यांच्याबरोबर काम सुरू केले. शीतल यांच्या आत्महत्येला 13 दिवस झाले आणि लगेच गौतम करजगी मुलगा शर्विलला घेऊन काल पुण्याला निघून गेल्याचे कळतंय.


आपले आणि मुलाचे पुढचे पाऊल नक्की काय ह्यावर फार काही बोलण्यास गौतम यांनी टाळले. मुलाला सध्या मात्र चेंजची गरज आहे आणि त्यामुळे गौतम करजगी ह्यांनी पुणे गाठल्याचे कळतंय. आनंदवनातील अजूनच कटू झालेली ही समीकरणे. त्यामुळेच आपली आनंदवनात वापसी ही स्वतःवर अवलंबून नसून आनंदवनाला आपली गरज आहे का? हे आनंदवनाने ठरवायला पाहिजे अशी भूमिका गौतम करजगींची असल्याचे कळतेय. शीतल आमटेंची आत्महत्या ही नक्कीच आमटे, करजगी परिवार तसेच आनंदवनासाठी खूप मोठा धक्का आहे. शीतल यांचा दुर्दैवी अंतानंतर तरी या विशाल मानवतावादी आनंदवनासाठी काम करणाऱ्यांचे मनभेद मिटावे ही भाबडी अपेक्षा आहे.



संबंधित बातम्या
कुत्र्यांसाठी मागवलेलं इंजेक्शन वापरून डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या?
डॉ. शीतल आमटे यांच्या आत्महत्येनंतर सासू-सासऱ्यांच्या फेसबुक पोस्टमुळे खळबळ; उपस्थित केले गंभीर प्रश्न
शीतल आमटे यांच्या आत्महत्येपूर्वी गेल्या काही महिन्यात काय-काय घडलं?