अमरावती : अमरावतीच्या नवनिर्वाचित खासदार नवनीत कौर-राणा यांचा रुद्रावतार आज पाहायला मिळाला. राणा यांनी अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालय आणि जिल्हा सामान्य रुग्णालयाची पाहणी केली. जिल्हा सामान्य रुग्णालयातील लहान मुलांच्या वार्डची अवस्था पाहून त्या चांगल्याच संतापल्या.


अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात घाणीचं साम्राज्य दिसलं. लहान मुलांच्या वॉर्डमधील शौचालयाची अवस्थाही वाईट आहे. लहान मुलांच्या वार्डची अशी अवस्था असेल तर बाकीचं काय, असा सवाल त्यांनी उपस्थित करत अधिकाऱ्यांना चांगलच खडसावलं.


रुग्णालयाच्या पाहणीदरम्यान एक धक्कादायक बाबही समोर आली. लहान मुलांना तारीख संपलेली औषधे देण्यात येत होती. ही निदर्शनास आल्यानंतर मात्र नवनीत राणा यांनी उपस्थित डॉक्टरांना चांगलच धारेवर धरलं.



मुदत संपलेल्या औषधामुळे रुग्णांची जीवितहानी झाली तर याला जबाबदार कोण? असा प्रश्न  त्यांनी डॉक्टरांना विचारला. रुग्णालयाची पाहणी करताना रुग्णालयात मोठ्या प्रमाणात अस्वच्छ दिसून आल्यावर नवनीत राणा यांनी रुग्णालय प्रशासनाला दोन दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. तसेच रुग्णालयाचा परिसर स्वच्छ ठेवण्याचे निर्देशही दिले.